Breaking News

बेंगलोरचा आंबा राहुरीच्या बाजारात दाखल


राहुरी, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तानंतर येथील मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात फळांचा राजा आंबा विक्रीसाठी आला आहे. यावर्षी आंब्याचे भाव प्रतीकिलो ५० ते ७० रुपयांनी वाढले आहेत. बंगलोरकंडील रसाळ आंब्याच्या वेगवेगळ्या जातींचे आंबे बाजारात उपलब्ध होत आहेत. कृषी विद्यापिठातील प्रसिद्ध केशरची चव चाखण्यासाठी आणखी काही काळ म्हणजे तब्बल महिन्याभराची वाट चोखंदळांना पहावी लागणार आहे. 
बंगलोरकडील बदाम, केशर, लालबाग, हापूस आदी आंबे येथील बाजारात आले आहेत. हापूस आंबा २५० रूपये, केशर २०० रूपये , लालबाग १७० रूपये, दशेरी २२० रुपयांपर्यंत भाव सांगितले जात आहे. स्थानिक व्यापारी हे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेने ५० ते ७० रुपयांनी जास्त असल्याचे सांगत आहेत. गेल्या वर्षी गुजरातमधून आलेल्या आंब्याला चांगली मागणी होती. यावर्षी गुजरातमधून माल यायला आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे. अशीच परिस्थिती राहुरीच्या कृषी विद्यापिठातील प्रसिद्ध आंब्याच्याबाबतीत आहे. विद्यापिठातील केशर आंबा राज्यात प्रसिद्ध आहे. मात्र हा आंबा बाजारात उशिरा येत आहे. आंबा खरेदी करणारे चोखंदळ ग्राहक आंब्याने चांगलाच भाव खाल्याने दोन किलो चार किलो याऐवजी एक किलोवरच समाधान मानत आहेत.