Breaking News

शाळेच्या इमारतीसाठी भीक मांगो आंदोलन स्थगित ; संस्थेने दिले लेखी आश्‍वासन

श्रीरामपूर /शहर प्रतिनिधी, दि. 11, एप्रिल - शहराजवळ हाकेच्या अंतरावर असलेल्या दत्तनगर गावांतील ज्ञानदीप मराठी शाळेची इमारत व्हावी यासाठी महात्मा फुले जयंतीचे औचित्य साधून भीक मांगो आंदोलन करणार असल्याचा इशारा श्रीरामपूर वसतिगृहाचे निरीक्षक अशोक लोंढे सह अन्य लोकांनी दिला होता. काम मार्गी लावण्याचे लेखी आश्‍वासन संस्थेने दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. दत्तनगर गावांतील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने गावांतील विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासाठी जि. प. शाळा 1 ली ते 4 थी व न्यानदीप शाळा 5 वी . ते 10 वी. पर्यंत आहे. न्यानदीप शाळा ही 2011 साली स्थापन झाली असून आज 18 वर्षांचा प्रदीर्घ कालावधी उलटून सुद्धा पत्र्यांच्या खोलीत भरत आहे. वर्षातील तिन्ही ऋतूंचा फटका या विद्यार्थ्यांना सोसावा लागत आहेत. त्यामध्ये उन्हाळ्यात कडाक्याच्या उन्हाने पत्रे तापणे, पावसाळ्यात वर्गात पाणी शिरणे, कडाक्याच्या थंडीत विद्यार्थी काकडतात  अशा अनेक समस्यांनी या शाळेला ग्रासले आहे. ही शाळा सावित्रीबाई फुले विद्या प्रसारक मंडळ टाकळीभान संचलित असून टाकळीभान गावांत यांच संस्थेची सुसज्ज अशी भव्य इमारत आहे. मग दत्तनगरच्या ज्ञानदीप शाळेला इमारत का नाही, शाळेच्या इमारतीसाठी अनेकदा मागणी करून देखील संस्थेचे पदाधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. उडवाउडवीची उत्तरे देऊन, वेळकाढूपणा करत आहे. वेळोवेळी शाळेच्या इमारतीसाठी मागणी करून सुद्धा हा महत्त्वाचा प्रश्‍न मार्गी लागत नसल्याने भीक मांगो आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. याची गंभीर दखल घेत सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव राजेंद्र कृष्णाजी भांड यांनी संस्थेकडून आंदोलनकर्त्यांना लेखी आश्‍वासन देत असे म्हंटले आहे की, शाळेची जागेअभावी इमारत बांधकाम बाकी असून, दत्तनगर ग्रामपंचायतला गावठाणसाठी जागा उपलब्ध झाल्याबरोबर संस्था इमारत बांधकाम लवकरच पूर्ण करण्यात येईल असे लेखी आश्‍वासन दिले आहे. संस्थेने लेखी आश्‍वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करीत असल्याचे अशोक लोंढे, सुरेश शिवलकर यांनी स्पष्ट केले आहे.
शाळेच्या इमारतीसाठी आम्हाला लेखी आश्‍वासन देऊन लवकरच काम मार्गी लावण्यात येईल असे जरी सांगण्यात आले असले तरी, आम्ही संस्थेला सहा महिन्यांचा दिर्घ कालावधीची मुदत देत आहोत, सहा महिन्यांत इमारतीचा प्रश्‍न मार्गी लागला नाहीतर आम्ही आमच्या आंदोलनाची तिव्रता वाढवून, शाळेच्या इमारतीसाठी वाट्टेल ते करण्याची आमची तयारी राहील.
अशोक लोंढे, श्रीरामपूर वसतिगृह निरीक्षक