Breaking News

सदगुरू नारायणगिरी महाराज पुण्यतिथी निमित्त पंचदिनात्मक कार्यक्रम

नेवासा, दि. 11, एप्रिल - नेवासा बुद्रुक शिवारातील सुरेगाव रस्त्यावर असलेल्या सद्गुरू नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठान प्रांगणात गुरुवार दि.12 एप्रिल ते 16 एप्रिल या कालावधीत ब्रम्हलीन सदगुरू नारायण गिरी महाराज यांच्या 9 व्या पुण्यतिथी निमित्ताने पंचदिनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे प्रमुख गुरुवर्य उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांनी दिली. श्री संत गंगागिरी महाराज व श्री समर्थ सदगुरु किसगिरी बाबा, वैकुंठवासी गुरुवर्य बन्सी महाराज तांबे, गुरुवर्य एकनाथ स्वामी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व पद्मभूषण स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रेरणेने पंचदिनात्मक अखंड नामयज्ञ व भजन कीर्तन महोत्सव साजरा होणार आहे. या सोहळ्यामध्ये पहाटे 4 ते 6 काकडा भजन, सकाळी 7 वाजता श्रींची आरती, सकाळी 8 ते 9 गीता पारायण व स्रोत्र पठण, सकाळी 10 ते 12  हरिकीर्तन,  दुपारी 12 ते 2 महाप्रसाद, दुपारी 4 ते 5 प्रवचन सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ, सायंकाळी 7 ते 9 यावेळेत पुन्हा हरिकीर्तन असे कार्यक्रम होणार आहे. सोमवार दि.16 एप्रिल रोजी सोहळा संयोजक उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या सकाळी 10 ते 12 यावेळेत होणार्‍या काल्याच्या किर्तनाने या पंचदिनात्मक सोहळ्याची सांगता होणार असून भाविकांनी पुण्यतिथी निमित्ताने आयोजित प्रवचन व कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांनी केले आहे.