बेताल वक्तव्याने कधी नव्हे ते आता उंच टोक गाठले असून त्याला लगाम घालण्याची गरज निर्माण झाली आहे. बेताल वक्तव्य करून आपल्या अपरिपक्व बुध्दीमत्तेचे दर्शन घडवणारे थोडेथोडके नसून जास्तच आहे. भाजपाचे सरकार केंद्रात आणि राज्यात आल्यापासून तर या बुवा-बाबांना अच्छे दिन आले. त्यामुळेच त्यांचे बेताल वक्तव्ये सहज खपत आहे, शिवाय क ारवाईचा कसलाही बडगा नाही. म्हणूनच दोन- चार दिवस झाले की एक तरी बाबा-साध्वी महाराज बरळणारच. हे आचरणाने बाबा, साध्वी, महाराज नसून त्यांचा तो आता व्यवसाय झाला आहे. त्यामुळेच त्यांचे प्रस्थ दिवसेदिवस वाढत आहे. कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या खासदारांना बेताल वक्तव्ये करू नये, असे आवर्जुन सांगितिले होते. त्यानंतर काही तास उलटत नाही, तोच साध्वी प्रज्ञा यांनी कठुआ येथे बलात्कार झालाच नाही, असे वादग्रस्त वक्तव्य केले. ‘कठुआ बलात्कार एक असं षडयंत्र आहे, जे ऐकून मनात एका विशेष जातीवर्गासाठी घृणा निर्माण होते. हा वर्ग आहे मुस्लीम, काँग्रेस आणि डावे आहेत. पण बलात्कारासारखा आरोप करत एका हिंदूला अडकवलं जातं. यापेक्षा बीभत्स राजकीय षडयंत्र असूच शकत नाही’, अस साध्वी यांनी म्हटले आहे. वास्तविक कठुआ प्रकरणी देशभरात संतापाची लाट उमटली असून, निदर्शने, आंदोलने होत आहे. तरी देखील या प्रकरणांवर आपल्या संवदेनशील भावना व्यक्त करण्याऐवजी साध्वी प्रज्ञा यांनी आपले अकलेचे तारे तोडले आहे. साध्वी या भगवे वस्त्र धारण करतांत, त्यामुळे त्यांनी आपल्या भगव्या वस्त्रांची आणि साध्वी असल्याचे तरी भान ठेवण्याची गरज होती. वास्तविक भगवी कपडे परिधान केली म्हणजे आपण साध्वी/साधू झालो हा चुकीचा कयास असून, भगवी वस्त्र झालून जर तुमच्या बुध्दीमत्तेची पातळी कणभर सुध्दा वाढत नसेल तर त्या साधू असण्याचा, निषेध करावा तेवढा थोडाच आहे. सामाजिक जवाबदारीचे कसलेही सोयरसुतक नसलेले, बुध्दीमत्तेचा कसलाही गंध नसलेले बुवा महाराज जेव्हा भगवी वस्त्र धारण करतात, आणि असे बेताल वक्तव्य करून आपल्या अकलेचे प्रदर्शन घडवतात तेव्हा त्यांची कीव येते. देशातील राजकीय वातावरण गढूळ झाले असून, त्यातून सत्ताधारी वर्गांतून रोजच नवीन बेताल वक्तव्यांची भर पडत आहे. साध्वी प्रज्ञा या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी देखील होत्या. मात्र सबळ पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे बेताल वक्तये सुरूच आहेत. ‘कठुआ बलात्कार एक असं षडयंत्र असून हिंदूना अडकवले जात असल्याचा साध्वी प्रज्ञा यांचा आरोप धर्म निरपेक्षतेला तिलाजंली देणारा असून, कठुआ बलात्कारातील त्या चिमुकलीला वेदना देणारा आहे. देशातील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती या निर्णयामुळे बिघडत चालली आहे. या बेताल वक्तव्यामुळे संविधान, आणि आजचे राजकीय वातावरण यात कुठेतरी लोकशाहीला, संविधानाला हरताळ फासण्याचे काम पध्दतशीरपणे सुरू आहे. कोणत्याही देशात लोकशाही सक्षमपणे रुजण्यासाठी खर्या अर्थाने गरज आहे ती मानवाला मुक्तपणे आपले स्वातंत्र उपभोगता आले पाहिजे. मात्र आजमितीस त्या मुक्त स्वातंत्र्याला कुठेतरी एक प्रकारची बाधा निर्माण होवू लागली आहे. येथील प्रत्येक माणसाला आपले हक्क, अधिकार मुक्तपणे उपभोगता आले पाहिजे. मात्र या अधिकारावरच कुठेतरी गदा येत आहे. आजमितीस देशातील वातावरण बघितले की, आपण कोणत्या मार्गाने चाललो आहोत, आणि शासनकर्ते त्याला कोणत्या मार्गाने घेवून जात आहे, हे दिसून येते. देशात सध्या अराजकता वाढत असतांना त्याची दखल घेण्याऐवढे साधे सौजन्य सत्ताधार्यांनी दाखवू नये? यासारखी दुसरी नामुष्की नाही. धर्मनिरपेक्ष वातावरणाला तिलांजली देत, धार्मिक वातावरण दूषित करण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे.
अग्रलेख - बेताल वक्तव्याचवे टोक !
Reviewed by Dainik Lokmanthan
on
07:38
Rating: 5