Breaking News

वरखेडच्या महालक्ष्मी देवीच्या यात्रोत्सवास सुरूवात

नेवासा (प्रतिनिधी) - नेवासा तालुक्यातील वरखेड येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या यात्रोत्सवास प्रारंभ झाला असून यावेळेस मंदिर परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. यात्रेत अवैध व्यवसाय करणार्‍यांवर व गैरवर्तणूक करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे यांनी दिला आहे. नेवासा तालुक्यातील वरखेड येथील श्री महालक्ष्मीदेवीचे ठाणे हे महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असून दरवर्षी देशाच्या कानाकोपर्‍यातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. त्यादृष्टीने येथे बुधवारी दि.4 एप्रिल रोजी सायंकाळी नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे यांनी मंदिरास भेट देऊन विश्‍वस्त मंडळ व ग्रामपंचायत पदाधिकारी स्वयंसेवक यांच्याशी चर्चा केली. यात्रेतील पार्कींग व्यवस्था, भाविकांना देण्यात येणार्‍या इतर सुविधा, दुकांनाचा अडसर न होता यात्रेकरूंना जागा उपलब्ध करून देणे याविषयावर चर्चा झाली. यात्राकाळात काही गैरकृत्य होऊ नये म्हणून मंदिर परिसरात प्रथमच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून या बाबत पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे यांनी अधिक माहिती घेऊन संबंधीतांना योग्य त्या सूचना केल्या. तसेच यात्रेत फेरफटका मारून रस्त्यावर अडसर वाटणार्‍या दुकानदारांना योग्य त्या सूचना देऊन कार्यवाही केली. यात्रेसाठी होणारी लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेता पोलीस यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. नेवासा पोलीस स्टेशनच्या वतीने नगर, पाथर्डी, शेवगाव, सोनई, शनिशिंगणापूर या पोलीस स्टेशन मार्फत ही पोलिसांची तुकडी बंदोबस्तासाठी मागविण्यात आली असून होमगार्ड, स्वयंसेवी संघटना व पोलीस मित्र यांचेही सहकार्य घेण्यात आले आहे. गर्दीचा फायदा घेऊन गैरकृत्य करणार्‍यांवर सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर रहाणार असल्याने बेशिस्त वागणार्‍यांवर तसेच यात्रेत दारूविक्री सह अवैध व्यवसाय करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिस निरीक्षक प्रविण लोखंडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिला आहे. श्री महालक्ष्मी देवीची यात्रा परंपरेनुसार येथे सुरू आहे, हजारो बोकड व कोंबड्यांचा बळी नवसापोटी येथे दिला जातो याला अंधश्रद्धा निर्मुलन समितीने नेहमी विरोध दर्शविला असून त्यास भारतीय लहुजी सेना ही होणारा विरोध आंदोलनाच्या माध्यमातून धुडकावून लावत भावना पायदळी तुडविणार्‍यांना आंदोलनाच्या माध्यमातून उत्तर देत आहे त्यामुळे परंपरेने वरील उपक्रम येथे आज ही सुरू आहे.वरखेड यात्रेत भाविकांना सेवा सुविधा जागेची उपलब्धता करून देण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत व ग्रामस्थांमार्फत सुरू आहे यात्रा उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडावी असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.