Breaking News

ग्रामीण अर्थकारण वाचविण्यासाठी पुढाकार घ्यावा : तनपुरे

राहुरी ता. प्रतिनिधी - साखरेच्या भावात दिवसेंदिवस घसरण होत चालल्याने साखर कारखान्यासमोर खूप मोठे संकट उभे राहिले आहे. साखरेचे भाव वाढविण्याबाबत केंद्र व राज्य सरकारने वेळीच उपाय योजना न केल्यास साखर उद्योग व त्यावर अवलंबून असलेल्या घटकांना भविष्यात मोठा फटका बसेल. ग्रामीण भागातील संपूर्ण अर्थकारण वाचवायचे असेल तर केंद्र व राज्य सरकारने याबाबत तातडीने पाऊल उचलणे गरजेचे आहे, असे मत राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष, माजी खा. प्रसाद तनपुरे यांनी व्यक्त केले.

वांबोरी येथील प्रसाद शुगरच्या गाळप हंगामाच्या सांगता समारंभ प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते भागवत पागिरे होते. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक सुशीलकुमार देशमुख, ज्येष्ठ संचालक, सुरेश बाफना, पंचायत समितीचे माजी उपसभापती धोंडीभाउ सोनवणे, तात्यासाहेब पानसंबळ, सुभाष आधाव, शेतकरी संघटनेचे डॉ. संजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.

तनपुरे म्हणाले, की सुरु असलेल्या हंगामात कारखाना चालवताना ज्या अडचणी आल्या, त्यात सुधारणा करून पुढील वाटचाल करावी लागणार आहे. यावर्षी चांगला पाऊस होणार आहे. त्यामुळे ऊसाचे क्षेत्र वाढणार आहे. त्यात साखरेचे भाव दिवसेंदिवस कमी कमी होत चालले असून त्याचा फटका उसाचे भावावर होत आहे. प्रारंभी कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक सुखदेव शेटे यांनी प्रास्ताविक केले. 

**