Breaking News

राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्याची भागीदारी असलेले हॉटेल किनारा जमीनदोस्त


नाशिक शहरातील मुंबई नाका येथील प्रसिद्ध हॉटेल किनारावर आज नाशिक महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाने बुलडोझर फिरवले. या हॉटेलमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसच्या एका दिग्गज नेत्याची भागीदारी असल्याची चर्चा शहरात आहे.आज सकाळी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाने ही कारवाई केली. मुंबई नाका परिसरातील हॉटेल किनारा नासर्डी नदीत भराव टाकून उभारण्यात आल्याची तक्रार मनपाकडून करण्यात आली होती. त्यानुसार आज पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.

हॉटेलचे मालक आणि भागीदार राजकारणी असल्यामुळे सुरुवातीला या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र महापालिकेचे विभागीय अधिकारी, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी दाखल होऊन कारवाईला मागेपुढे न पाहता सुरुवात करण्यात आली.दरम्यान, नासर्डी नदीपात्रात भराव टाकून अनधिकृतपणे किनारा हॉटेलचे बांधकाम करण्यात आले असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले आहे. या हॉटेलमध्ये एका नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या नेत्याचीही भागीदारी असल्याचे प्राथमिक माहिती आहे. गेल्या महिन्याभरापासून नाशिकमध्ये अतिक्रमण विरोधी मोहीमेने चांगलीच गती घेतली आहे. आयुक्त मुंढे यांच्या प्रत्येक कारवाईवर नाशिकक रांनी समाधान व्यक्त केले आहे.
  • रस्त्यावर ठाण मांडून बसलेले विक्रेते, इमारतींवर किंवा घरांवर केलेले अनधिकृत अतिक्रमण, दुधबाजार परिसरात तर संपूर्ण इमारतच जमीनदोस्त करण्यात आली. आयुक्तांच्या कारवाईनंतर मात्र हॉकर्स संघटना कमालीच्या नाराज झालेल्या असून त्यांच्याकडून मोर्चेदेखील काढण्यात आले. मात्र, आयुक्तांची कारवाई सुरूच असून अतिक्रमण करणार्‍यानी कारवाईचा चांगलाच धसका घेतला आहे. याप्रसंगी विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली मोहीम राबविण्यात आली. बुलडोजरच्या साहाय्याने बांधकाम पाडण्यात आले.