Breaking News

अंगारकी चतुर्थीला पावन गणपती मंदिरात भाविकांची मांदियाळी


नेवासा येथील दगडी खानिजवळील पावन गणपती मंदिरात अंगारकी चतुर्थीला हजारो भक्तांनी दर्शन घेतले. नेवासा ते नेवासा फाटा रोडवर असलेल्या पावन गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांचा दिवसभर ओघ सुरू होता. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची गर्दी होती. दर चतुर्थीला सकाळी ग्रामफेरीने भाविक दर्शनासाठी येत असतात.अंगारकी चतुर्थीला आलेल्या ग्रामफेरीतील भाविकांनी गणपतीची सामूहिक आरती केली.यावेळी आलेल्या सर्व भाविकांसाठी अँड. के.एच.वाखुरे यांचे वतीने चहाची व्यवस्था करण्यात आली होती. 

परिसरात हार फुले नारळ अगरबत्ती,मिठाई,खेळणी इत्यादींची दुकाने थाटली होती. गर्दीमुळे मोठ्या यात्रेचे स्वरूप आले होते.नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती पावन गणपतीची असल्याने जिल्ह्यातून व राज्यातून भाविक या ठिकाणी दर्शनाला येत असतात. नव्याने उभारण्यात आलेले मंदिर दाक्षिणात्य कारिगीरीचा उत्कृष्ट नमुना असून मंदिरावर बसवलेले शिल्प आकर्षक आहेत. बाराही महिने चतुर्थीला नामवंत किर्तनकारांची कीर्तने होतात व त्यानंतर महाप्रसाद होतो. अंगारकी चतुर्थीनिमित्त कंठाळे महाराज यांचे श्रवणीय कीर्तन झाले. त्यानंतर भाऊ गव्हाणे यांचे तर्फे महाप्रसाद देण्यात आला.मोठ्या संख्येने यावेळी भाविक उपस्थित होते. मंदिर परिसरात विकासात्मक कामे चालू असून, पेव्हिंग ब्लॉक, कंपाउंड, पाण्याची टाकी आदी कामे प्रलंबित आहेत.सदर देवस्थानचा क वर्गात समावेश व्हावा अशी भाविकांची मागणी आहे. देवस्थानचे अध्यक्ष सुखदेव वाखुरे व विश्‍वस्त मंडळ त्यासाठी प्रयत्नशील आहे.