प्रवरेच्या कृषी व कृषी संलग्ननीत महाविद्यालयात सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन मेळावा
प्रवरानगर, राज्य सामायिक प्रवेश परिक्षा कक्षातर्फे घेण्यात येणार्या एमएचटी-सीईटी या प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी,औषधनिर्माणशास्त्र व कृषी अभ्यासक्रमांसाठीच्या सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लोणीतील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात शनिवार (दि.२१ एप्रिल स. ९:०० ते साय. ५:००) रोजी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य ऋषिकेश औताडे यांनी दिली.
कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात राज्य सामायिक प्रवेश परिक्षा कक्षातर्फे घेण्यात येणार्या एमएचटी-सीईटी या प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी,औषधनिर्माणशास्त्र व कृषी अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश परिक्षेसाठी शनिवार (दि.२१ एप्रिल स. ९:०० ते साय. ५:००) रोजी अभियांत्रिकी शिक्षणातील संधी,फार्मसी आणि एग्रीकल्चर एज्युकेशन या विषयावरील समुपदेशन चर्चासत्र व एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या समुपदेशन वेबिनार द्वारे कृषी शिक्षणातील विविध शाखेतील असलेल्या संधीबद्दल माहिती संबंधित विषय तज्ञ देणार आहेत त्यामध्ये कृषी जैवतंत्रज्ञान - अन्न तंत्रज्ञान, कृषी - वन - कृषी अभियांत्रिकी, मत्स्य - पशुसंवर्धन, उद्यानविद्या व दुग्ध तंत्रज्ञान शाखेबद्दल अनुक्रमे डॉ. एच. बी. पाटील, प्राचार्य, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लातूर, डॉ. एस. एस. माने, सहायक अधिष्टाता, कृषी महाविद्यालय, अकोला, डॉ. एस. बी. फटांगे, मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी, प्रा. एस. डी. मासळकर, प्राचार्य, उद्यानविद्या महाविद्यालय, शिवाजीनगर पुणे व डॉ. पी. जी. वासनिक, सहायक अधिष्टाता, दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय, लातूर ई. विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
या कार्यक्रमात एमएचटी-सीईटी नोंदणी केलेल्या सर्व उमेदवारांसाठी ही कार्यशाळा नि:शुल्क आहे. यासाठी लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाची प्रसार केंद्र म्हणून निवड करण्यात आली असून या केंद्रावर विद्यार्थी व पालक यांना ऑनलाईन तज्ञांशी संवाद साधता येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली असून या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थे द्वारे करण्यात आले.