Breaking News

व्यापाऱ्यांच्या मनमानीला बाजार समितीचा पाठींबा


कोपरगाव, कृषी उत्पन्न बाजार समिती येवला आणि तिची शाखा असलेली उपसमिती अंदरसुल ही दोनही मार्केट कांदा खरेदीसाठी परिसरात अग्रेसर आहेत. येवला, नांदगाव, वैजापूर, कोपरगाव तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात या मार्केटवर लिलावासाठी कांदा आणतात. मात्र उत्पादकांना कांदापट्टीची रोख रक्कम न देता तब्बल एक महिन्यानंतरच्या तारखेचे धनादेश शेतकऱ्यांना दिले जातात. शेतकरी जेव्हा बँकेत जातात. तेव्हा धनादेश देणाऱ्या व्यापाऱ्याच्या खात्यात पुरेशी शिल्लकच नसल्याने वटला नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांना कष्टाने पिकवलेल्या मालाचे वेळेवर पैसे मिळत नसल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
यासंदर्भात पढेगावचे सरपंच प्रकाश किसन शिंदे यांनी सांगितले, अंदरसुल बाजार समितीत दि. २० फेब्रुवारी रोजी विकलेल्या कांद्याची खरेदी शंकर दत्तात्रय पैठणकर यांनी खरेदी करुन एकूण रक्कम ४० हजार ३० रुपयांचा धनादेश दि. ६ मार्चला दिला. अंदरसुल अर्बन को-बँकेचा हा धनादेश खात्यात पुरेशी शिल्लक नसल्यामुळे वटलाच नाही. त्यांनतर शिंदे यांनी व्यापारी, मार्केट कमेटीचे पदाधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन हा प्रकार उघडकीस आणला. वास्तविक पाहता 

शेतकऱ्याने बाजार समितीत विकलेल्या मालाचे २४ तासांच्या आत रक्कम अदा करणे गरजेचे आहे. मात्र व्यापारी आणि समितीचे पदाधिकारी यांची ‘मिलीभगत’ झाल्यामुळे यात शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण केले जात आहे. ऐन लग्न सराईत शेतकऱ्यास आणखी कात्रीत पकडण्याचा प्रयत्न व्यापारीवर्गाकडून होत आहे. हा जाच शेतकरी आत्महत्येचे मुख्य कारण असल्याचे शेतकरी बोलून दाखवत आहेत. याबाबत येवला बाजार समितीचे सचिव डी. सी. खैरनार यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला.