साईबाबा संस्थानच्या ६४ कामगारांच्या बदल्या
साई संस्थाच्या कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी पदभार घेतल्यानंतर संस्थानच्या बाबतीत विविध निर्णय घेऊन आपल्या कामाची चुणूक दाखविली आहे. संस्थानकडे कायम २ हजार ०३९ कर्मचारी आहेत. आउटसोर्सिंग व ठेकेदारी पद्धतीने कामगार मोठ्या प्रमाणावर आहेत. संस्थानच्या लेखा शाखा, सामान्य प्रशासन, हॉस्पिटल, द्वारावती, भक्त निवास, साईबाबा हॉस्पिटल, प्रसादालय आदींसह विविध विभागात लिपिक टंक लेखक आदींचा बदल्या झालेल्यांमध्ये समावेश आहे. प्रशासकीय धोरणानुसार बदल्या केल्याचे सूचित करण्यात आले आहे. दि. १४ जुलै २०१७ च्या आदेशानुसार ठरवून दिलेल्या कामाची जबाबदारी कायम राहील. बदली कामगारांनी पदभार सोडून बदलीच्या ठिकाणी व विभागात तात्काळ हजर होण्याचे सूचित करण्यात आले आहे. परंतु बदल्यांबाबत मोठी चर्चा होत आहे. बदल्यामध्ये संस्थानने मदतनीस असो किंवा कोणाचीही बदली करताना शैक्षणिक पात्रताही सुद्धा बघितली जावी. तसेच मंदिर पी. आर. ओ., संरक्षण अशा महत्वाच्या विभागात अनेक दिवसांपासून कायम व कंत्राटीबाबत ही धोरण ठरविले जाण्याची गरज आहे. याकडेही मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष गुप्ता यांनी घालण्याची भावना कामगार वर्गात आहे. राजकीय वशिला व संबंधाच्या जोरावर काही कर्मचारी बदली रद्द होण्यासाठीही प्रयत्न करताना दिसून येत आहेत. काही कामगारांत मात्र समाधान व्यक्त होत आहे.
