Breaking News

स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा बोरीवलीमध्ये

मुंबई, दि. 10 एप्रिल -  राज्य सरकारच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य कुस्तीगार परिषद तसेच मुंबई उपनगर जिल्हा पूर्व व पश्‍चिम तालीम संघ आणि विभागीय क्रीडा संकुल कार्यकारी समिती यांच्यावतीने मुंबई उपनगरात प्रथमच चौथी स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा (पुरुष व महिला) चे आयोजन बोरीवली मध्ये करण्यात आले आहे. या स्पर्धेचा शुभारंभ 13 एप्रिल रोजी होणार असून 15 एप्रिलला कुस्ती स्पर्धेचा समारोप होणार आहे.
राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा (पुरुष महिला) 2017-18 च्या स्पर्धांमध्ये फ्री स्टाईल गटात 100 पुरुष खेळाडू, ग्रीको रोमन गटात 100 पुरुष खेळाडू तर फ्री स्टाईल गटात 100 महिला खेळाडू असे एकूण 300 खेळाडू सहभागी होणार आहेत. 2017-18 वर्षाची ही स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल, शिंपोली, बोरीवली या ठिकाणी 13 ते 15 एप्रिल 2018 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. फ्री-स्टाईल, ग्रीको रोमन आणि महिला फ्री-स्टाईल गटामध्ये 10 वजनगटात स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. तसेच बक्षिसाच्या ग्रीको रोमन व फ्री-स्टाईल गटामध्ये रु. 10,40,000/- प्रत्येकी तर महिलांच्या फ्री स्टाईल गटामध्ये रु. 10,40,000/- अशी एकुण रु. 31,20,000/- ची बक्षिसे या वर्षीच्या कुस्ती स्पर्धेत देण्यात येणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन 13 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. याप्रसंगी ऑलिम्पिक विजेते पैलवान नरसिंह यादव उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेचा समारोप 15 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे.
भारतासाठी पहिले व कुस्तीतील हे पहिले ऑलिंपिक ब्राँझ पदक विजेते स्व. खाशाबा जाधव यांनी कुस्ती क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा गौरव म्हणून राज्य स्तरावर त्यांच्या नावाने स्व. खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीची जोपासना व वाढ होण्यासाठी विविध खेळांच्या माध्यमातून युवा पिढीला खेळाकडे आकृष्ट करणे व त्यांच्या मधील क्रीडा गुणांना वाव देणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात कुस्ती सारख्या देशी खेळाबाबत ग्रामीण व शहरी भागात विशेष आत्मियता आहे. कुस्ती हा खेळ महाराष्ट्रात सर्वत्र खेळला जातो. देशातील इतर राज्यात व देशाबाहेरही कुस्ती खेळाचा प्रचार व प्रसार करण्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. राज्याची कुस्ती खेळातील कामगिरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरही उल्लेखनीय आहे.