Breaking News

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पहिल्या टप्प्यात 1011 गावांची निवड

मुंबई, दि. 10 एप्रिल -  नानाजी देशमुख प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सात जिल्ह्यातील 1011 गावांची निवड करण्यात आली असून 106 गावांच्या कामांचे प्रत्यक्षात नियोजन करण्यात आले आहे, असे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी येथे सांगितले. या प्रकल्पाच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर येथील नूतनीकरण करण्यात आलेल्या कार्यालयाचे उदघाटन कृषिमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते. प्रकल्पाबाबत आढावा बैठक यावेळी घेण्यात आली.
याबाबत माहिती देतांना कृषिमंत्री म्हणाले, जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राज्यातील 15 जिल्ह्यातील 155 तालुक्यातील 5142 गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यापैकी 932 खारपाण पट्ट्यातील गावे आहेत. त्याचा फायदा 17 लाख शेतकर्‍यांना होणार आहे.
प्रथम टप्प्यात निवडलेल्या गावांमध्ये उस्मानाबाद जिल्हयातील 43, अमरावती 210, बुलढाणा 91, यवतमाळ 54, वर्धा 10, अकोला 89, वाशिम 29 अशा 131 गावसमूहातील 1011 गावांची निवड करण्यात आली आहे. प्रकल्पासाठी गावांचे सूक्ष्म नियोजन, ग्राम कृषी संजीवनी समिती, खारपान जमिनीचे प्रश्‍न याबाबत यावेळी चर्चा झाली. प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक विकास रस्तोगी यांनी सादरीकरण केले. यावेळी प्रकल्पाच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन फुंडकर, खोत यांच्या हस्ते करण्यात आले.