Breaking News

टाकावूपासून टिकावू तयार करणार्‍यांना प्रोत्साहन देणार - सुभाष देसाई

मुंबई, दि. 10 एप्रिल -  टाकावूपासून टिकावू वस्तू तयार करण्याची भारताची अनेक वर्षांपासून परंपरा आहे. भविष्यात अशा प्रकारचे काम करणार्‍या कंपन्या राज्यात सक्रिय झाल्यास त्यास सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे राज्य सरकारचे धोरण राहील, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी फ्रान्स येथील शिष्टमंडळास दिले.
मोठ्या शहरात दिवसेंदिवस स्वयंचलित वाहनांची संख्या वाढत आहे. याचसोबत कालबाह्य झालेल्या वाहनांची समस्यादेखील सर्वांना भेडसावत आहे. कालबाह्य वाहने नष्ट करून किंवा त्या वाहनांचा पुन्हा वापर करण्यासाठी फ्रान्सची इंदिरा कंपनी कार्यरत आहे. भारतात ही कंपनी आपला विस्तार करण्याच्या तयारीत आहे. पर्यावरण संवर्धानासोबत भंगार वाहने नष्ट करण्याचे काम ही कंपनी करत आहे. जगभरात अनेक देशात कंपनी काम करते. भारतात देखील ही कंपनी आपला विस्तार करण्याच्या तयारीत असल्याचे शिष्टमंडळाने यावेळी सांगितले.
यावेळी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बे रोझेट, तांत्रिक विभाग प्रमुख आँलिवर ग्वाझु, महिंद्रा सनयो स्पेशल स्टिल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक उदय गुप्ता, कार्यकारी अधिकारी दिलीप पाचपांडे, सल्लागार सतीश घोरगे, नाथ इक्जिमचे संचालक विरंजन नाथ आदी उपस्थित होते. दरम्यान, पुनर्वापर आणि प्रक्रिया हे भविष्याची गरज असून उद्योग मंत्रालय अशा कंपन्यांना कायम पाठिंबा देईल, असा विश्‍वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. अशा प्रकारच्या कंपन्या सुरू करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. अशा प्रकारच्या कंपन्या सुरू करण्यासाठी राज्य सरकार विशेष धोरण तयार करेल, असे आश्‍वासन देसाई यांनी दिले.