Breaking News

कृषी विद्यापीठाच्या रोपवाटिकेला लागलेली आग शमवण्यात यश

प्रतिनिधी । राहुरी शहर ;- महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या रोपवाटिकेला लागलेली आग शमवण्यात सुरक्षा विभागाला यश आले. दरम्यान, ही आग लागण्याचे कारण गुलदस्त्यात आहे. विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर आगीत झाडे जळण्याची गेल्या दोन महिन्यांतील ही दुसरी घटना असल्याने झाडांच्या सुरक्षेबाबत विद्यापीठाच्या संबंधित विभागाचा कारभार रामभरोसे असल्याचे स्पष्ट झाले. 

विद्यापीठाच्या पशू संवर्धन व दुग्धशाळेसमोर असलेल्या रोपवाटिकेला आग लागल्याची माहिती मिळताच सुरक्षा विभाग प्रमुख गोरक्षनाथ शेटे यांनी सुरक्षा कर्मचार्‍यांसमवेत घटनास्थळी धाव घेतली. रोपवाटिकेजवळील झाडांच्या फांद्या तोडून सुरक्षा कर्मचार्‍यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा अधिकारी शेटे यांनी अग्निशमन दलाला, तसेच विद्यापीठाच्या टँकरला घटनास्थळी पाचारण केले. तासभराच्या प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली. रोपवाटिकेतील आंबा, चिंच, लिंब या झाडांना आगीची झळ पोहोचली. दोन महिन्यांपूर्वी कृषी विद्यापीठ प्रक्षेत्रावर उभारलेले सिमेन स्टेशनजवळील झाडे जळण्याची घटना घडली होती. ही झाडे जळाली की जाळली, याचा उलगडा अद्याप झालेला नसतानाच शुक्रवारी कृषी विद्यापीठ प्रक्षेत्रावरील रोपवाटिकेला आग लागल्याने सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.