Breaking News

घटस्फ़ोटित मुलीशी लग्न केल्याने कुटुंब वाळीत जातपंचायतीचा जाच सुरुच

अहमदननगर जिल्ह्यातील मुस्लीम समाजातील वाघवाले जमातीच्या लोहगांव येथील जातपंचायतीने घटस्फ़ोटित मुलीशी लग्न केल्याने संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जातपंचायतीचा जाच आजही काही केल्या कमी होताना दिसत नाही. अहमदनगर जिल्ह्यातील वाघवाले जमातीतील दोन्ही कुटुंब जातपंचायतमुळे बहिष्कृ ताचे जीवन जगत आहेत. 


याबाबत लोणी पोलिसात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणी आयेशा अली शेख रा. बाभळेश्‍वर हिने जातपंचायतीच्या 7 जणांविरोधात फिर्याद दिली. यामध्ये बाबन रहेमान पठान, हबीब दगडू पठान, बक्षण गुलाब पठान रा. प्रवरानगर सैय्या हसन शेख रा. प्रवरानगर, उस्मान हज्जुभाई पठान रा.लोहगांव, इमाम धोंडी शेख रा.लोहगांव, गफूर बालम पठान रा. बाभळेश्‍वर यांचा समावेश आहे. या फिर्यादीत म्हटले आहे, या सर्वजणांनी प्रवरानगर येथे बक्षण गुलाब पठान यांच्या घरासमोर जात पंचायत भरविली. त्यामध्ये आली यांचे आई- वडील अर्थात माझे सासू-सासरे यांना बोलावून सांगितले, तुम्ही वीसचा दंड भरा. नाही तर तुम्हाला वाळीत टाकले जाईल. नाइलाजास्तव माझ्या सासू सासर्‍याने दीड लाख रुपये जात पंचायतीस दिले. मात्र तरीही माझ्या कुटुंबियांस गेल्या 6 वर्षांपासून जातीतून बहिष्कृत के ले आहे. तसेच आमच्या लग्नातही त्यांनी विघ्न आणले होते. त्यामुळे नाइलजास्तव 2013 मध्ये आम्ही सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न केले. आमचे मुळचे गांव असलेल्या लोहगांवमधून आम्हाला हाकलून दिले आहे. त्यानंतर आम्हाला आमच्या नातेवाईकाच्या लग्न अथवा अंत्यविधी कार्यात सहभागी होऊ दिले जात नाही. माझ्या आजी व मेव्हण्याच्या अंत्यविधीला मला जाऊ दिले नाही. जात पंचायतीच्या दबावामुळे आम्हाला कोणासोबत बोलू दिले जात नाही. अथवा कुठल्याही कार्यात आम्हाला जाता येत नाही. दरम्यान, या घटनेचा तपास पो. हे. कॉ. शामराव गाडेकर करीत आहेत.
20 चा दंड म्हणजे काय?
घटस्फोटित मुलीशी लग्न करणार्‍या मुलाचा मृत्यू झाल्याचा विधी करायचा. चाळीसावा घालायचा आणि या जोडप्याने समाजापासून दूर राहायचे, अशी 20च्या दंडाची शिक्षा असते.
समाजातून बहिष्कृत केलेल्या या परिवारासोबत कोणताही संबंध ठेवायचा नाही किंवा कार्यक्रमासही बोलवायचे नाही. अशा प्रकारचे आयुष्य गेली 6 वर्षे ही आयशा आणि अली जगत आहेत. लोहगावला स्वतः चे घरही आहे. मात्र आपले घर सोडून दुसर्‍या गावात उपेक्षितांचे जीवन जगण्याची वेळ या दोघांसह परिवारावर आली आहे.