Breaking News

कष्टाचा पैसा कामगारांनी सत्कारणी लावावा : कोल्हे

कोेपरगांव:- बांधकाम क्षेत्रात सध्या कार्यरत असलेल्या कामगारांचे जीवनमान अतिशय कष्टाचे असते. त्यामुळे या कामगारांनी कमविलेला पैसा व्यसनावर न उडविता तो आपल्या कुटूंबाच्या पोषणासाठी सत्कारणी लावावा, असे आवाहन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष आणि साईबाबा संस्थानचे विश्वस्त बिपीन कोल्हे यांनी केले.

कोपरगांव तालुका इमारत बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने गुरूद्वारारोड येथील भाजपा पक्ष कार्यालयात बांधकाम कामगारांच्या मुलांना उपयोगी पुस्तक संचाचे वाटप नुकतेच करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. अहमदनगर कामगार कल्याण विभागाच्या आयुक्त सुवर्णा गायकवाड यांनी बांधकाम कामगारांसाठी असणा-या शासनाच्या विविध योजनांची यावेळी माहिती दिली. प्रारंभी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर रोकडे आणि उपाध्यक्ष सादिक पठाण यांनी उपस्थितांचे स्वागत केले. बांधकाम व्यावसायिक सोमेश कायस्थ यांनी बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांच्या अडीअडचणी मांडून यासाठी आ. स्नेहलता कोल्हे करीत असलेल्या प्रयत्नांबददल माहिती दिली. खजिनदार शब्बीर शेख यांनी प्रास्तविक केले. सचिव सुधाकर क्षिरसागर, सल्लागार किसन भाबड, नगरसेवक संजय पवार, सतिष जाधव, नजिर शेख, रामनाथ जाधव, नारायण गवळी, सतिष रानोडे आदी यावेळी उपस्थित होते.

बिपीन कोल्हे म्हणाले, आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. बांधकाम कामगारांनी आपल्या मुलामुलींना शालेय शिक्षणाबरोबरच संगणकीय शिक्षण देण्यांवर भर द्यावा. ग्रामीण भागातील मुलांना संगणकीय ज्ञान माहिती व्हावे, यासाठी संजीवनी एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्याने संगणक व्हॅन तयार केली आहे. त्याचा बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांच्या मुलामुलींसाठी लाभ व्हावा. शासनाच्या अनंत योजना असतात. पण त्याच्या पाठपुराव्यासाठी सर्वांनी जाणिवपूर्वक प्रयत्न करावेत. कामगारांच्या मुलांना वाटण्यात आलेल्या पुस्तक संचामध्ये शब्दकोश अवांतर सामान्य ज्ञानाची पुस्तके उपलब्ध आहेत. त्याचा सर्वांनी उपयोग करावा. सल्लागार किसन भाबड यांनी आभार मानले.