निधाने खून प्रकरणातील खरे आरोपी जेरबंद करा; अन्यथा आक्रमक आंदोलन
राहाता : येथील रामदास निधाने या तरुणाच्या खुनातील खरे आरोपी अद्यापही मोकाट आहेत. त्या आरोपींना अटक करा, जर तुमच्यावर राजकीय दडपण येत असेल तर या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे द्या, यातील खऱ्या आरोपींना अटक झाली नाही तर आक्रमक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राहाता पोलीस ठाण्यावर नेण्यात आलेल्या मोर्चाद्वारे देण्यात आला.
शहरातील नागरिकांनी काढलेल्या या मोर्चात निधानेच्या खुनातील आरोपींना पोलिसांनी अटक करावी, हॉटेलमध्ये असणारे सीसीटीव्ही फुटेज तपासून निधानेच्या खून करणारे मुख्य आरोपींना पोलीसांनी ताब्यात घ्यावे आदी मागण्या करण्यात आल्या. या खूनप्रकरणी हॉटेल मालकाची पोलिसांनी चांगल्याप्रकारे चौकशी करणे गरजेचे होते. परंतू त्यांना त्यांची सखोल चौकशी पोलीसांनी केली नाही, असा आरोप नागरिकांनी केला.
यावेळी नगरसेवक साहेबराव निधाने, धनंजय गाडेकर, उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, डॉ. स्वाधीन गाडेकर, विजय मोगले, विनायक निकाळे, संभाजी ब्रिगेडचे साहेबराव कुदळे आदींनी या मोर्चात भावना व्यक्त केल्या. शहरातील नागरिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.