Breaking News

आपल्या पोटी अपंग बालक जन्माला आले याची खंत बाळगू नका तर त्याचा अभिमान बाळगा

श्रीरामपूर /शहर प्रतिनिधी /- पालकांनो अपत्य ही आपली संपत्ती आहे. तिची जोपासना करुन ती वृद्धींगत कशी होईल याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. आपल्या पोटी अपंग बालक जन्माला आले याची खंत बाळगू नका तर त्याचा अभिमान बाळगा, असे प्रतिपादन अपंग साहित्यिक प्रा. यशवंत पुलाटे यांनी पालक मेळाव्यात बोलतांना केले. येथील रोटरी एज्युकेशन ट्रस्टच्या मूकबधीर विद्यालयात आयोजित पालक मेळाव्यात ते बोलत होते. संस्थेचे चेअरमन सुरेश बनकर, रोटरीचे अध्यक्ष सुरेश थोरात, सचिव विनोद पाटणी, ज्येष्ठ साहित्यिक भास्कर लगड यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राध्यापक यशवंत पुलाटे म्हणाले की, आयुष्यात पोलिओमुळे अपंगत्व आले. परंतु मनाने खचून न जाता परिस्थितीला सामोरे जावून अपंगत्वावर आपण मात केली. साहित्यक्षेत्रात आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे. या कार्यक्रमप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक कल्याण होन यांनी केले. अपंग आयुक्त कार्यालयाने तातडीने इ.5 वी ते 8 वी तुकड्यांना मान्यता द्यावी अन्यथा पालक लोकशाही मार्गाने मान्यतेसाठी प्रयत्न करतील, अशी मागणी पालकांनी केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संजय साळवे यांनी केले तर आभार गोरख शेटे यांनी मानले.