Breaking News

साईसंस्थानमध्ये अनुकंपा पात्र वारसांना फटका


शिर्डी/ प्रतिनिधी - साईबाबा संस्थानमध्ये वेगवेगळ्या विभागात मोठ्या प्रमाणावर कामगार काम करतात. ज्या कामगारांचा अकाली मृत्यू झाला त्यांच्या वारसांनी अनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी, यासाठी २००८ सालापासून पाठपुरावा केला आहे. मात्र अनुकंपापात्र वारसांना अद्यापपर्यंत न्याय मिळालेला नाही. याचा फटका अनेकांना बसत आहे. घरातील कर्ता माणूस अकाली निघून गेल्यानंतर कुटुंबाची मोठी ओढाताण होते. अशावेळी ज्याठिकाणी घरातील व्यक्ती काम करते, त्या संस्थानने सहानुभूतीपूर्वक जर वारसांना नोकरीची संधी देण्याचा प्रयत्न केला तर वारसांचे पुढचे जीवन सुकर होत असते. मात्र संस्थानमध्ये रिक्त जागा नसल्याचा फटका या वारसांना बसला आहे. त्यातून संस्थानच्या व्यवस्थापनाने २००० ते २०१८ पर्यंत ५२ जणांच्या यादीतील ३१ जणांना ठेकेदारी पद्धतीवर कामावर घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र तरीही इतर राहिलेल्या लोकांनाही कार्यकारी अधिकारी रुबल गुप्ता आणि विश्वस्त मंडळाकडून न्याय मिळणार तरी कधी, असा सवाल या कामगारांच्या वारसांच्या कुटुंबाकडून विचारला जात आहे. कामगारांच्या कुटुंबांना व वारसांना कार्यकारी अधिकारी रुबल गुप्ता या न्याय देतील, अशी अपेक्षा चंद्रकांत खरात या तरुणाने व्यक्त केली आहे