Breaking News

वॉटर कप स्पर्धा : श्रमदान करून नवदाम्पत्यांचा शुभविवाह


कर्जत, नव दांपत्याने श्रमदान करून माळरानावरच आपल्या शुभ विवाहाचा सोहळा वॉटर कप स्पर्धेच्या कामावर करून समाजासमोर आदर्श ठेवला. या अभूतपूर्व सोहळ्यास पालकमंत्री ना. प्रा. राम शिंदे उपस्थित होते.

लग्न म्हटलं की फेटे, हारतुरे, मानपान अन् सत्काराचा जंगी सोहळा. डीजे, फटाक्यांची आतषबाजी, वर्‍हाडी मंडळीचा थाट, मिरवणार्‍या करवल्या, यासाठी होणारा अनाठायी खर्च, या सर्व बाबीसह खर्चाला फाटा देत नव वधू-वराने टाकळी खंडेश्‍वरी येथे श्रमदान करुन विवाहबध्द होण्याचा निर्णय घेवून वर नाना वाघमारे आणि वधू शीतल पुजारी यांनी समाजासमोर एक आगळा-वेगळा आदर्श ही निर्माण केला आहे.

कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्‍वरी गावात पाणी फौंडेशनव्दारा आयोजीत सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018 अंतर्गत काम सुरु आहे. येथे सुरू असलेल्या कामावर पहिल्या दिवसापासून श्रमदान करणारा नाना वाघमारे आणि वधू शीतल पुजारी या पदवीधर युवकांनी आज सकाळपासूनच श्रमदान केले. त्यानंतर आज दुपारी 12 वाजता स्थापलिंग डोंगरावर हा साधा विवाहसोहळा संपन्न झाला. या नवदाम्पत्यांनी समाजासमोर एक नवीन आदर्श निर्माण केल्या बद्दल पालकमंत्री प्रा. राम शिंदे या नवदाम्पत्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा 
दिल्या. उपसभापती किरण पाटील यांनी या नवदाम्पत्याची माहिती देताना आमचे गाव स्पर्धेत उतरले असून बक्षीस जिंकणारच असा विश्‍वास व्यक्त केला. 

यावेळी प्रांत अधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार किरण सावंत पाटील, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, भारतीय जैन संघटनेचे तालुकाध्यक्ष अभय बोरा, रोटरी क्लब ऑफ, नितिन देशमुख, डॉ. राजेंद्र खेत्रे, यश बोरा, शुभम गुंदेचा, यांचेसह सरपंच संध्याराणी फडतरे, उपसरपंच डॉ. सागर ढोबे, बाळासाहेब सपकाळसर, दत्तात्रय सकट, दिलीप चांडे, सुधीर फडतरे, दत्तात्रय डुबल, गौतम पवार, शिवाजी पाटील, काका सकट, आदीसह परीसरातील हजारो स्त्री पुरुष नागरिक उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन राजेंद्र डुबल यांनी केले. नवदांपत्याने आपल्या विवाहाच्या खर्चातून वाचलेल्या पैशातून 5 हजार रुपये श्रमदानाच्या कामासाठी राहुल सकट व गोपीनाथ ढोबे यांचेकडे ना. शिंदे यांचे हस्ते सुपूर्द केले.