Breaking News

महाराष्ट्र शासन उभारणार दीड हजार कोटींचे कर्ज

मुंबई - महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2020 अंतर्गत महाराष्ट्र शासनाने दीड हजार कोटी रूपयाचे कर्ज रोखे विक्रीसाठी काढले आहेत. 3 वर्षे मुदतीच्या या कर्ज रोख्याची विक्री ही 24 एप्रिलला रिझर्व्ह बँकेच्या फोर्ट शाखेत करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने 3 वर्षे मुदतीसाठीचे 500 कोटी रुपयांचे रोखे विक्रीस काढले असून ही विक्री शासनाच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी आणि शर्थींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेला रकमेचा विनियोग महाराष्ट्र सरकारच्या विकास कार्यक्रमासंबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल. शासकीय रोख्यांची विक्री भारतीय रिझर्व्ह बँकेच्या फोर्ट शाखेच्यावतीने सुधारित सर्वसाधारण अधिसूचनेतील कार्यप्रणालीनुसार लिलावाने करण्यात येईल. अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येणार असल्याचे शासनाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे दिनांक 24 एप्रिल 2018ला त्यांच्या फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात हा लिलाव आयोजित करण्यात येईल. लिलावाचे बिडस् दिनांक 24 एप्रिल 2018ला संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाची आहेत.