Breaking News

विद्युत जनित्र त्वरित न बसवल्यास आंदोलनाचा इशारा


पाथर्डी (प्रतिनिधी) - गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा करूनही भगवाननगर फुलेनगर परिसरात मंजूर असलेले विद्युत जनित्र बसवण्यात येत नसून लवकरात लवकर ते बसवुन सुरू करण्यात यावे अन्यथा 10 दिवसांनंतर कसलीही पूर्वसूचना न देता तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नगरसेवक प्रसाद आव्हाड यांनी महावितरण पाथर्डी शहर कक्षाचे सहाय्यक अभियंता वैभव सिंग यांना निवेदन देऊन देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत पाथर्डी शहरासाठी सुमारे 30 नवीन विद्युत जनित्र बसवण्यात येणार आहेत. तसेच वीजचोरीला आळा घालण्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही भागांत भूमिगत वीजजोड दिले जाणार आहेत. सदर योजना राबवण्यासाठी इतर तांत्रिक बाबींची पूर्तता झालेली असून पाथर्डी नगरपरिषदेत या योजनेला ना हरकत देण्यासाठी मोठे रणकंदन, सभात्याग होऊन शेवटी ना हरकत मंजूर झाली असून नागरिकांचे सद्यस्थितीत चालू जनित्रावर असलेल्या अतिरिक्त भारामुळे अतोनात नुकसान व गैरसोय होत असून अनेकांच्या घरातील दूरचित्रवाणी संच, वातानुकूलन यंत्र आदी विद्युत उपकरणे निकामी झाली आहेत.सदर निवेदन देताना झालेल्या चर्चेप्रसंगी साहित्यसामुग्री अभावी सदर काम रखडले असून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे काम मार्गी लावण्याचे आश्‍वासन सहाय्यक अभियंता सिंग यांनी नगरसेवक प्रसाद आव्हाड यांना दिले आहे.