Breaking News

मदडगावात चितपट कुस्त्यांचा थरार पीरबाबा यात्रा उत्सव

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील मदडगाव येथे पीरबाबांच्या यात्रेनिमित्त भरविण्यात आलेल्या कुस्त्यांचा आखाडा चितपट कुस्त्यांनी गाजला. गावात बंद पडलेला कुस्तीचा आखाडा तब्बल वीस वर्षानंतर भरविण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साह संचारला होता. पंचक्रोशीतील मल्लांनी या आखाड्याला हजेरी लावून कुस्तीच्या डावपेचांनी ग्रामस्थांच्या डोळ्याचे पारणे फेडले. 

एकशे एक रुपयापासून तर पाच हजार रुपया पर्यंन्त कुस्त्या लावण्यात आल्या. तर उत्तम कुस्ती करणार्‍या मल्लांवर ग्रामस्थांनी रोख बक्षिसांचा वर्षाव केला. पराजित होणार्‍या मल्लांना देखील प्रोत्साहनपर बक्षिस देण्यात आली. मुलींनी देखील मातीत कुस्त्या केल्या. उपस्थितांनी टाळ्याच्या कडकडाटात मल्लांना दाद दिली. महाराष्ट्र केसरी अशोक शिर्के, उप महाराष्ट्र केसरी अनिल गुंजाळ, बबन काशिद, योगेश पवार, वसंत पवार यांच्या हस्ते कुस्ती लावून आखाड्याला प्रारंभ करण्यात आला. हलगीच्या नीनादात रंगलेल्या कुस्तीचा थरार पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष साहेबराव शेडाळे, उपाध्यक्ष जयवंत काळे, गोवर्धन शेडाळे, बन्सी शेडाळे, संतराम चव्हाण, दत्तुजी काळे, पोपट शेडाळे, शिवाजी कांबळे, मल्हारी कांबळे, शहाजी शेडाळे, मुरलीधर गायवळ, धर्मराज शेडाळे, नितीन सुंबे, स्वप्निल खेडकर, सर्जेराव शेडाळे, आजीनाथ गायवळ, गणेश आठरे, मोहन शेडाळे, बाळासाहेब शेडाळे, राजूभाई शेख, नानासाहेब शेडाळे,नगर तालुका पो.स्टे. चे नरेश चव्हाण, भास्कर शेडाळे, सिताराम शेडाळे आदि उपस्थित होते. पंच म्हणून महाराष्ट्र कुस्ती चॅम्पियन पै. भाऊसाहेब धावडे व अ‍ॅड.शहाजी शेडाळे यांनी काम पाहिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यात्रा कमिटी सदस्य व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. यात्रा उत्सवानिमित्त गावात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेच्या पहिल्या दिवशी कलगीतुर्‍याचा कार्यक्रम रंगला होता.