
नगर । प्रतिनिधी - अस्वच्छ पाणी प्यायल्यामुळे प्रसंगी अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यासाठी प्रत्येकाने शुद्ध व स्वच्छ पाणी पिणे आवश्यक आहे. नगरमधील मनपाचे कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालय शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून, रुग्णांमध्ये ते विशेष लोकप्रिय आहे. या दवाखान्यातील रुग्णांची संख्या मोठी आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस तर आहेत, शिवाय इतरही वेळी रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना स्वच्छ व शुद्ध, तसेच थंडगार पाणी मिळावे, या उद्देशाने येथे फिल्टर वॉटर कुलर बसविण्यात आला आहे. हा कुलर बसविणे ही रुग्णालयाची प्रथम गरज होती. स्वच्छ पाणी पिल्याने तुम्ही निरोगी राहण्यात मदत होते, असे महापौर सुरेखा कदम यांनी सांगितले. मनपा महिला व बालकल्याण समिती निधीतून कै. बाळासाहेब देशपांडे दवाखाना येथे फिल्टर वॉटर कुलर बसविण्यात आला. त्याचे उद्घाटन महापौर सुरेखा कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी महिला बालकल्याणच्या सभापती सारिका भुतकर, उपसभापती सुनीता मुदगल, स्थायीच्या सभापती सुवर्णा जाधव, सदस्या श्रीमती प्रतिभा भांगरे, डॉ. सतीश राजूरकर, डॉ. शिल्पा पाठक, डॉ. घनश्याम घोलप आदी उपस्थित होते. सभापती सुवर्णा जाधव यांनी महिला व बालकल्याण समितीच्या या उपक्रमाचे कौतुक करून चांगले काम करीत असल्याबद्दल धन्यवाद दिले. देशपांडे रुग्णालयात येणार्या रुग्णांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न यामुळे सुटल्याचे त्या म्हणाल्या.