Breaking News

लायन्स क्लब वंचितांसाठी समाजसेवेचा ब्रॅण्डनेम -गिरीश मालपाणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, अहमदनगर मिलेनियम व प्राईड या तीन्ही क्लबच्या वतीने वर्षभर राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक कार्यांचा आढावा घेण्यासाठी प्रांतपाल गिरीश मालपाणी व रिजन चेअरमन संदिप कोयटे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. या बैठकित क्लबच्या वतीने वर्षभर राबविण्यात आलेल्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, पर्यावरण व आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. तसेच यावेळी सामाजिक कार्यात आपला ठसा उमटविणारे प्रदिप पंजाबी व अमर कळमकर यांना लायन्स समाज मित्र पुरस्काराने गौरविण्यात आले. 

पाहुण्यांचे स्वागत झोन चेअरमन किरण भंडारी यांनी केले. हरजितसिंह वधवा यांनी प्रास्ताविकात क्लबची माहिती दिली. यावेळी तीन्ही क्लबचे अनुक्रमे अध्यक्ष जस्मितसिंग वधवा, सोनी रंगलानी, अभिजीत भळगट, सचिव आनंद बोरा, दिपा माळी, कृष्णा जाजू, खजिनदार मानसी असनानी, वंदना ललवाणी, रोहित धूत आदिंसह क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्लबच्या अध्यक्षांनी प्रारंभी वर्षभरात राबविलेल्या सामाजिक कार्याचा लेखाजोखा मांडला.
गिरीश मालपाणी म्हणाले की, लायन्स क्लब वंचितांसाठी समाजसेवेचा ब्रॅण्डनेम बनला आहे. अनेक गरजू घटकांपर्यंन्त जावून काही अपेक्षा न ठेवता क्लबच्या वतीने कार्य चालू आहे. आपल्या व्यवसायाच्या नफ्यातील काही भाग समाजातील वंचित घटकांसाठी खर्च करुन लायन्सच्या सदस्यांनी मोठे सामाजिक कार्य उभे केले आहे. सामाजिक ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने योगदान दिल्यास अनेक प्रश्‍न सुटणार असल्याची भावना व्यक्त करीत, क्लबच्या कार्याचे कौतुक केले. संदिप कोयटे यांनी लायन्स क्लबने केलेले सामाजिक कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगून, राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाचे कौतुक केले.