Breaking News

व्हॉल्टेयर...? ...!

बहुजनांनो.... !
अल्पवयीन मुलींवर बलात्कारांची त्सुनामी! काश्मिरमध्ये चक्क मंदिरात, उत्तरप्रदेशात भाजपा आमदारच बलात्कारी, गुजराथमध्येही ........! दुसरीकडे ब्राह्णी आंतकवादी सुप्रिम कोर्टातून व हायकोर्टातुन निर्दोष सुटत आहेत. 2019 च्या निवडणुका जसजशा जवळ येतील तसतशा या घटना घडवून आणण्याचे प्रकार वाढत जाणार आहेत. दिल्लीतील निर्भयाप्रकरणाने ‘खास’ झालेले आम आदमीवाले केजरीवाल, कवी विश्वास, बेदीबाई आणी त्यांचे गुरु हजारे आण्णा हे सर्व अशा बलात्कार प्रकरणांकडे ढुंकूनही बघत नाहीत. यावरून अशी प्रकरणे केवळ करियर बनविण्यासाठी वापरली पाहिजेत, असा त्यांचा धडा असावा.

आपण बहुजन मात्र अशा प्रकरणांकडे गंभीरतेने पाहतो. आरडाओरडा करतो, मेणबत्त्या घेऊन फिरतो, फेसबुक, व्हाट्सपवर शिव्याशाप देतो, गुन्हेगारांचा निषेध, सरकारचा निषेध आणि काही दिवसांनी पुन्हा शांत! नव्याने एखादी घटना घडण्याची वाट पाहात....! कोणत्याही घटनेच्या मुळाशी जायला आम्ही केव्हा शिकणार? एखादी घटना घडविली जात आहे काय? एखाद्या घडत असलेल्या घटनेचं भांडवल कोणी करीत आहे काय? असे प्रश्नच कधी मनात उभे राहात नाहीत. अर्थात असे प्रश्न मनात येण्यासाठी आपला मेंदू शाबूत असावा लागतो. आपला मेंदू अजूनही ब्राह्मणी व्यवस्थेच्या जाळ्यात बंदिस्त आहे. जात-धर्म, भाषा-प्रांत आदि वादाच्या पलेकडे आपली सोच जात नाही. त्यामुळे आपले शत्रू कोण? मित्र कोण? याचे कोणतेही भान ठेवले जाते. ब्राह्मणी मिडियांमधून जे काही दिशा-दिग्दर्शन कले जाते, त्या प्रमाणे कोणाही विरुध्द भडकतो, कोणाच्याही मांडीलामांडी लावून बसतो.

आपले प्रदिर्घ भल्याचे काय व आपल्याला तात्कालीक छोट्या छोट्या घटनांमध्ये कसे अडवून धरले जात आहे, हे आपल्याला कळतच नाही. उदाहरण म्हणून अनेक घटना सांगता येतील. पण मी एक-दोनच सांगतो. राममंदिर आंदोलन हे मंडल आयोग दडपण्यासाठी होतं हे आम्हाला फार उशिरा कळालं. ओबीसींनी आपल्या परीने त्याचा बदला घेतला. जागृत होत असलेल्या ओबीसींनी कॉंग्रेस-भाजपासारख्या तथाकथित राष्ट्रीय पक्षांचे कंबरडे मोडले. एकही राष्ट्रीय म्हणविणार्‍या पक्षाला देशात सरकार स्थापन करता येत नव्हतं. स्थापन केले तरी ते कधी 13 दिवस तर कधी 13 महिन्यातच गडगडत होतं. ओबीसींनी काही राज्यात आपले स्वतःचे पक्ष स्थापन केले व सत्तेवरही आणलेत. परंतू ज्याप्रमाणे तामिळनाडूच्या ओबीसींचा पक्ष भाषा-प्रांतवादात अडकून तामिळनाडूतच मर्यादित राहीला, त्याचप्रमाणे लालू - मुलायमचा ओबीसी पक्ष कुटुंबवादात तर बहनजींचा दलित पक्ष ब्राह्मणांच्या जाळ्यात अडकून पडला.

जातीआधारावरचे पक्ष हे जातीअंताचे कार्य पार पाडू शकत नाहीत. त्यांना विशिष्ट छोट्या काळासाठी यश मिळतं, परंतू प्रदिर्घ राजकीय डावपेंचात ते कमी पडतात व ब्राह्मणवादाची सरशी होते. ब्राह्मणवादाचीच नेहमी सरशी का होते? याचं साधं कारण हे आहे, की ब्राह्मणवाद हे केवळ जातीय तत्वज्ञान नाही. ब्राह्मणवाद हे ‘अर्थ-धर्म-जात-वंश’ वादाचं अजब असे रसायन आहे. चाणक्याचा थोडा जरी अभ्यास केला तरी ह्या विषारी रसायनाचा अंदाज येतो. अर्थात प्रदिर्घ संघर्षाचं ते फलित आहे. आजही संघर्षात ते कोठेच कमी पडत नाहीत. 81 वर्षांचा म्हातारा भिडे-भटजी कोणत्या व्यक्तीगत-कौटुंबिक स्वार्थासाठी लढतो आहे? अशा अनेक भिडेंच्या त्यागावर त्यांचे दिल्ली-तख्त उभे आहे.

ब्राह्मणवादी तत्वज्ञान म्हणजे अर्थ-धर्म-जात-वंशवादाचं अजब रसायन आहे व ते प्रदिर्घ संघर्षाचं फलित आहे. चाणक्यापासून आर्यभटापर्यंतचे त्यांचे विद्वान व परशूरामापासून पुष्यमित्र शृंगांपर्यंतचे त्यांचे लढवैय्ये अशा अनेकांचा त्यात सहभाग आहे. पण या सर्वांना त्यांनी त्या त्या काळापुरते मर्यादित ठेवले. त्यांचे पुतळे-स्मारके बनवून त्यांच्या तंगडीला त्यांनी स्वतःला कधीच बांधून घेतले नाही. बदलत्या काळात, बदलत्या संघर्षात त्यांनी नेतेही बदलते ठेवलेत. त्यामुळे धोरण व डावपेंचही बदलते राहीलेत. हा मुद्दा समजून सांगण्यासाठी बाळ गंगाधर टिळकांचे उदाहरण देणे उपयुक्त ठरेल. जेव्हा शाहू महाराजांचा वेदोक्त विरूद्ध पुरोणोक्त वाद सुरू झाला, टिळक काय म्हणाले ते काळजीपूर्क पाहिले पाहिजे. शिवाजी राजेंना गागाभट्टाने वैदिक राजाभिषेक केला, म्हणून शाहू राजेंनाही तो अधिकार मिळेल, असे समजणे चुकीचे आहे. येथे गागाभट्टांचे अनुकरण करणे योग्य होणार नाही. ज्या काळात प्रश्न निर्माण होतात त्याच काळातील ब्राह्मण विद्वान त्या प्रश्नाचे उत्तर सांगतील. आपण मात्र प्रत्येक प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी फुले-आंबेडकरांच्या पोथ्या उघडतो.

एट्रॉसिटी ऍक्टवर मराठा मोर्च्यांपासून गडांतर यायला लागले होते. त्यावेळी मी ‘एट्रॉसिटी एक्ट अधीक मजबूत करीत त्याचा बलुतेदार ओबीसी जातींपर्यंत विस्तार करवा’, अशी मागणी केली. मी अशी भुमिका मांडल्यानंतर आमच्या काही विद्वानांनी लगेच बाबासाहेबांना कोट करीत सांगीतले की, ‘हा एक्ट फक्त अस्पृश्यांसाठीच आहे’. हे महाशय एवढेच सांगून थांबले नाहीत तर ते माझे आंबेडकरवादाबद्दलचे अज्ञानही बाहेर काढतात. खरे म्हणजे एट्रॉसिटी एक्ट हा काही बाबासाहेबांच्या काळातला नाही. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर 30 वर्षानंतर अस्तित्वात आला. मान्यवर व्हि.पी. सिंगांसारख्या दुरदृष्टीच्या नेत्यांनी तो अस्तित्वात आणला. पण त्यातून जातीय तेढ वाढवित अस्पृश् विरोधात स्पृश्य अशा धृविकरणाला गतिमान करण्यासाठी त्याचा वापर होऊ लागला. मराठा मोर्च्यांच्या संयोजकांनी त्याला अधिक टोकदार करीत त्यात ओबीसींनाही ओढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मी या प्रतिगामी भुमिकेला शह देण्यासाठी नवी भुमिका घेत सांगीतले की, हा एक्ट अधिक मजबूत झाला पाहिजे व त्याचा विस्तार ओबीसी बलुतेदारांपर्यंत केला पाहिजे. यातून मी दोन गोष्टी साधल्या. एक म्हणजे प्रतिगामी मराठा मोर्च्यात ओबीसींना जाण्यापासून रोखले. दुसरे हे की, या एक्टला अधिक जनमाणसांचा सपोर्ट मिळविण्यासाठी ओबीसी बलुतेदारांनाही या एक्टचा फायदा व्हावा, असे सांगीतले.

आजही खेडे गावात नाभीक, परिट, कुंभार वगैरे सारख्या अल्पसंख्य जातींना अपमानित जीवन जगावे लागते आहे. त्यांच्या जातींचा अपमानजनक उल्लेख करूनच त्यांना हाक मारली जाते. अशावेळी त्यांना अधिक वास्तवपणे मित्र करून घ्यायला काहीच हरकत नाही. मात्र अजूनही हे वास्तव समजून घ्यायला आंबेडकरवादी विचारवंत नेते तयार नाहीत. त्याचा परिणाम असा झाला की, आज एट्रॉसिटी एक्टचे धिंडवडे निघत आहेत. सुप्रिम कोर्टाने त्याला निकामीच करून ठेवले आहे. ओबीसींमधील बलुतेदारांना बरोबर घेऊन आंदोलन झाले असते, तर असे घडले नसते.

या उलट ब्राह्मण जात प्रत्येकवेळी आपल्या पुर्वज विद्वानांकडे न बघता सद्यकाळातले विद्वानच वाट शोधतात. नव्या वाटा शोधण्यासाठी ते आपल्यात कधीच महापुरूष (व्हॉल्टेयर) निर्माण होऊ देत नाहीत. कारण हे व्हॉल्टेयर पुढच्या पिढींचे हातपाय बांधून टांगतात. त्यातून एक पोटभरू वर्ग तयार होतो. हा पोटभरू वर्ग आपल्या जातीतील व्हॉल्टेयरचे पुतळे-स्मारके उभारून आख्खा समाजच त्याच्या दावणीला बांधायचा प्रयत्न करतो. याचा परिणाम असा होतो की नव्या काळातील नवी आव्हाने जुन्याच तत्वज्ञानाच्या आधारे सोडविणार्‍या वैचारिक भक्तांचाही एक वर्ग तयार होतो. अशा प्रयत्नात नवी वाट शोधणारे गद्दार ठरतात. महापुरूषांचे खरे अनुयायी मरतात व भक्त पोसले जातात. प्रेरणा नष्ट होते व भक्ती जागा घेते. भारतिय मार्क्सवादी जरी ब्राह्मण असले तरी ते मार्क्सवादाचा विकास होण्यात अडथळे आणीत आहेत. आज परिस्थितीच्या दडपणाखाली ते जातीअंताच्या राजकीय धोरणाशी मिळते-जुळते घेत असले तरी, त्यांनी मुळातूनच आपली भुमिका बदलणे गरजेचे आहे. मार्क्सवादाचा विकास जातीअंताच्या भुमिकेपर्यंत व फुलेआंबेडकरवादाचा विकास वर्गांतच्या भुमिकेपर्यंत होणे काळाची गरज आहे.

आजच्या बहुजन समाजासमोर हाच मोठा गंभीर प्रश्न आहे. त्याचा विचार केला तरच आपण सामाजिक संघर्षात उभे राहू शकतो.

सत्य की जय हो !!

------- प्रा. श्रावण देवरे

Whatsap No. Mobile – 88 301 27 270