Breaking News

हरिनाम सप्ताह सोहळ्यात सर्वांनी एकत्र या : आ. थोरात


संगमनेर, तालुक्यातील पिंपळगाव देपा येथे दि. ६ जून रोजी भव्यदिव्य असा प. पू. गगनगिरी महाराज यांचा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या अखंड हरिनाम सप्ताहासाठी सर्वांनी एकत्र या, असे आवाहन राज्याचे माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केले.
जून महिन्यात होत असलेल्या या हरिनाम सप्ताहाच्या ध्वजारोहनाचा कार्यक्रम अक्षय्य तृतीयाच्या शुभमुहूर्तावर पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प. पू. आशिष महाराज, आ. डॉ. सुधीर तांबे, ह. भ. प. निवृत्ती महाराज इंदोरीकर, दिलीप शिंदे, रणजितसिंह देशमुख आदी उपस्थित होते. ध्वजारोहनानंतर आ. थोरात म्हणाले, तरुणपणाचा त्याग करुन आशिष महाराजांनी प. पू. स्वामी गगनगिरी महाराजांच्या सेवेत संपूर्ण आयुष्य घालवले. कसलाही मोह न ठेवता त्यांनी सेवा केली. पुर्वी जसे शिष्य आश्रमात राहून सेवा करायचे, तसे या युगात आशिष महाराज त्याचे जीवंत उदाहरण आहे. आशिष महाराजांच्या रुपाने प. पू. गगनगिरी महाराज आज आपल्यात आहेत. त्यांचा आशिर्वाद आपल्याला मिळत आहे. सप्ताह काळात गरीबाचा एक रुपयासुद्धा खूप किंमतीचा असतो. महाराजांचे जीवन निसर्गाच्या निगडीत होते. म्हणून सप्ताह काळात जे झाडं मिळतात, ते प्रत्येकाने आपल्या दारात लावा. त्यामुळे गगनगिरी महाराजांचा आशिर्वाद आपल्याला मिळत राहिल.

प. पू. आशिष महाराज म्हणाले, मानवी जीवनात सत्कर्म करा. अक्षय्य तृतीयाचा हा योग दर तीन वर्षांनी येतो. या पवित्र दिवशी आपण ध्वजारोहन करुन सप्ताहाचा पाया रोवतो, असा योग दुर्मिळ असतो. ही परंपरा गगनगिरी भक्त परिवाराने पूर्णपणे जतन केली आहे. या दिवशी लोक खरे तर सोनं खरेदी करतात. त्यामुळे आपल्या लक्ष्मीत वाढ होते. परंतु आज या ठिकाणी आपण सर्वांनी भक्तीचे सोने खरेदी केले. वृक्ष लागवड करा. अनेक पिढयांना त्याचे आशिर्वाद मिळतील. कोणतेही व्यसन करु नका. व्यसनांपासून दूर रहा. जीवनात कष्ट करा. सत्य वागा. देवाची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सप्ताह कमिटीचे दिलीप शिंदे, बापूसाहेब देशमुख, संजय महाराज देशमुख, आबासाहेब थोरात, विलास काळे, नवनाथ वर्पे, काभू रहाणे, संदीप वर्पे, कपिल पवार, अ‍ॅड. दादाभाऊ वर्पे, मनिष माळवे, कृपाल डंग, बाळासाहेब अंभोरकर, रामभाऊ देशमुख, सुनिल खरे, रविंद्र देशमुख, अ‍ॅड. सुदाम आहेर आदींसह समस्त पिंपळगाव देपा, खंडेरायवाडी, मोेधळवाडीचे ग्रामस्थ आणि गगनगिरी महाराज भक्त आदींनी विशेष परिश्रम घेतले.