खोटी माहिती देणाऱ्या शिक्षकांवर कारवाईची 'छडी'!
सध्या सुरू असलेल्या जि.प. प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत ऑनलाइन बदली प्रक्रियेत खोटी माहिती भरणाऱ्या शिक्षकांवर शिस्तभंगाची कडक कारवाई करण्यात येणार आहे. २७ फेब्रुवारी २०१७ च्या ग्रामविकास खात्याच्या शासन निर्णयानुसार जि.प. शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या होणार असून यामध्ये संवर्ग १ व संवर्ग २ मध्ये समाविष्ट शिक्षकांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. संवर्ग १ मध्ये ५३ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले शिक्षक, गंभीर आजारी, स्वत: दिव्यांग व दिव्यांग अथवा गतिमंद मुलांचे पालक, आजी माजी सैनिकांच्या पत्नी, विधवा, घटस्फोटीत यांचा समावेश आहे. तर संवर्ग २ मध्ये ३० किमीपेक्षा अधिक अंतर असणाऱ्या पतीपत्नी एकत्रिकरणाचा समावेश आहे.
