Breaking News

‘एम. जी. पी.’ ची जलशुद्धीकरण यंत्रणा बंद


शिर्डी/ किशोर पाटणी : राहाता तालुक्यातील सावळीविहीर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या तलावातून चार गावांना पाणी पुरवठा करून जवळपास २० हजार लोकांची तहान भागविणाऱ्या या तलावात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आणि डॉ. सुजय विखे यांच्या प्रयत्नांतून ताडपत्री टाकून पाण्याची गळती रोखण्यात यश मिळाले होते. त्यामुळे पाणी टंचाईचा प्रश्न सुटला असला तरी याठिकाणी बसविण्यात आलेली जलशुद्धीकरण यंत्रणा अनेक दिवसांपासून बंद आहे. 
सावळीविहीर खुर्द आणि बुद्रुक, निमगाव-कोऱ्हाळे, निघोज या गावातील पिण्याचे पाणी फिल्टर न होता फक्त तुरटी आणि पी. सी. एल. पावडर टाकलेले पाणी पिण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. ८ एकर जागेत हा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा तलाव आहे. त्याठिकाणी ४ पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या असून अद्ययावत माशिनरीसुद्धा बसविलेली आहे. या ठिकाणावरून चार ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील लोकांना पिण्यासाठी पाणी दिले जाते. २ ते ३ महिन्याच्या अंतराने आवर्तन आल्यानंतर हा तलाव भरून घेतला जातो. पाणी शुद्धीकरणासाठी रेती बदलण्याची गरज आहे. पाणी फिल्टर करणारी यंत्रणा थंड अवस्थेत आहे. याठिकाणी भेट दिली असता कोणता ही प्रतिनिधी दिसून आला नाही. पाझर तलावालगत एक झोपडी दिसून आली. इमारतीमध्ये कामगाराला राहण्यासाठी जागा असतानाही अनधिकृत झोपडी कशी, हा प्रश्न असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून जवळपास २० वर्षांपूर्वी ही योजना मंजूर झाली. तिचे कामही झाले. जीवन प्राधिकरणाने ही योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केलेली आहे. या कार्यालयात जीवन प्राधिकरणाचा कर्मचारी नसल्याचे दिसून आले. ग्रामपंचायत स्थरावर एका माणसाकडून हे सर्व काम करून असे असताना त्याठिकाणी लाखो रुपये खर्च करून फिल्टर यंत्रणा व असलेली माशिनरी याची देखभाल दुरुस्ती व काळजी घेण्यासाठी प्राधिकरणाकडून दुर्लक्ष होत आहे. या ४ गावाच्या लोकांना फिल्टर न झालेले पाणी पिण्याची वेळ आली आहे.