Breaking News

लातूरच्या विकासाचा नवा पॅटर्न तयार करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



लातूरच्या परीक्षेचा पॅटर्न देशभर प्रसिध्द आहे. हा पॅटर्न तुम्ही तयार केला आता राज्याचा मुख्यमंत्री म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लातूरचा विकासाचा पॅटर्न तयार करुन लातूरचे नाव देशाच्याच नव्हे तर जगाच्या नकाशावर झळकावणार. रेल्वेच्या या मेट्रो रेल्वे कोच फॅक्टरीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असून काही हजार हाताना काम मिळणार आहे. युवकांचे स्थलांतर थांबणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

लातूर शहराजवळील हरंगूळ येथील रेल्वेतर्फे उभारण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी मेट्रो रेल कोच फॅक्टरीच्या भूमिपूजन समारंभानंतर शहरातील क्रीडा संकुलात आयोजित केलेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय रेल्वे तथा कोळसा मंत्री पीयुष गोयल, राज्याच्या महिला व बालविकास आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्याचे कामगार, कौशल्य विकास, भूकंप पुनर्वसन, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, लातूर शहराचे महापौर सुरेश पवार, खासदार डॉ. सुनिल गायकवाड, आमदार सर्वश्री. सुधाकर भालेराव, सुरजितसिंह ठाकूर, विनायकराव पाटील, अमीत देशमुख, त्र्यंबकराव भिसे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलींद लातूरे, दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्र शर्मा, सोलापूर रेल्वेचे डीआरएम हितेंद्र मल्होत्रा, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन ईटनकर, पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड, मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, अभिमन्यू पवार, भाजपचे प्रवक्ते गणेश हाके आदी उपस्थित होते.