Breaking News

अनियमित वीज पुरवठा नियमित करावा ; नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांचे महावितरणला निवेदन


श्रीरामपूर / शहर प्रतिनिधी /- कोणतीही पूर्व सूचना न देता विज वितरण कंपनीने सुरु केलेला अनियमित वीज पुरवठा महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीने नियमित करावा. हा विद्युत पुरवठा उन्हाळ्यात अनियमित होत असल्याने सर्वांनाच त्याची झळ बसत आहे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी आपल्या समर्थकांसह वीज कंपनीच्या कार्यालयात जाऊन मुख्य अभियता शरद बंड यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, सध्या महाराष्ट्रात उन्हाचा पारा वाढलेला आहे. श्रीरामपूर तालुक्यात व शहरात उष्णतेच्या झळा जानवत आहेत. उष्माघाताच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. वाढत्या उष्णतेचा परिणाम सर्वसामान्यांना जाणवू लागला आहे. त्यातच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून श्रीरामपूर शहरात होत असलेले वीज पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. शहरात अवेळी भारनियमन करण्यात येत आहे. भारनियमनाचा फटका सर्वांनाच बसत आहे. शहरातील छोटे मोठे व्यावसायिक, व्यापारी वर्ग, सर्वसामान्य जनता या भारनियमनामुळे अक्षरशः वैतागली आहे. याचबरोबर शहराच्या पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम झालेला आहे. तरी तातडीने अवेळी भारनियमन बंद करावे व पूर्ण दाबाने शहरात वीज पुरवठा करण्याच्यादृष्टीने उपापयोजना कराव्यात, अशा मागणीचे निवेदन नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी कार्यकारी अभियंता शरद बंड याना दिले.