Breaking News

मुंबई महापालिकेची ऐतिहासिक 5 हजार 132 कोटींची कर वसूली

मुंबई, दि. 11, एप्रिल - महापालिकेच्या उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये मालमत्ता कराचा मोठा वाटा असल्याने मालमत्ता कराची योग्य वसुली होणे, ही देखी सेवा सुविधांच्या दृष्टीने गरजेची बाब आहे. आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये महापालिकेच्या इतिहासात प्रथमच मालमत्ता कर वसुलीचा 5 हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला गेला आहे. मालमत्ता कर वसुलीची जबाबदारी असणा-या करनिर्धारण व संकलन खात्याने विविध स्तरीय प्रयत्न व जनजागृती केल्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी तब्बल रुपये 5 हजार 132 कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याचे उप करनिर्धारक व संकलक सर्वश्री प्रल्हाद कलकोटी व अरविंद चव्हाण या दोन कार्यतत्पर अधिकार्‍यांचा ’एप्रिल 2018’ या ’महिन्याचे मानकरी’ अर्थात म्हणून स्वरुपात महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे.
या सत्कार प्रसंगी अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) डॉ. संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त (पश्‍चिम उपनगरे) आय. ए. कुंदन, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल, अतिरिक्त आयुक्त (शहर) आबासाहेब ज-हाड, उपायुक्त (आयुक्त कार्यालय) रमेश पवार, सहाय्यक आयुक्त (करनिर्धारण व संकलक) देवीदास क्षीरसागर यांच्यासह महापालिकेचे सर्व संबंधित उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व विभाग प्रमुख आदी उपस्थित होते. आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये महापालिकेच्या करनिरर्धारण व संकलन खात्याला 5 हजार 402 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी सप्टेंबर 2017 अखेरपर्यंत केवळ 2 हजार 88 कोटी एवढीच रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा झाली होती. त्यामुळेच मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट साध्य होण्याबाबत शंका देखील उपस्थित करण्यात आल्या होत्या. तथापि, अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनात व सहाय्यक आयुक्त (करनिर्धारण व संकलक) देवीदास क्षीरसागर यांच्या नेतृत्वात करनिर्धारण व संकलन खात्याने केलेले सूत्रबद्ध व सर्वस्तरीय प्रयत्न, मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करणा-यांवर केलेली कारवाई याचा चांगला परिणाम दिसून आला. ज्यामुळे डिसेंबर 2018 अखेरपर्यंत 3 हजार 66 कोटी, तर फेब्रुवारी अखेरपर्यंत 3 हजार 746 कोटी महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले होते. त्यानंतरच्या केवळ एका महिन्यात, म्हणजेच फक्त मार्च महिन्यात 1 हजार 386 कोटी रुपये मालमत्ता-करा पोटी जमा झाले. यानुसार वर्षभरात तब्बल 5 हजार 132 कोटी व 75 लाख रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले. जे गेल्या वर्षीच्या मालमत्ता कर वसुलीपेक्षा 285 कोटींनी अधिक आहेत. आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये 4 हजार 847 कोटी रुपये एवढी मालमत्ता कर वसुली झाली होती. यात आणखी एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच मालमत्ता कर वसुलीचा तब्बल 5 हजार कोटींचा टप्पा ओलांडण्यात आला आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन आणि मालमत्ता कर वसुलीसाठी सुत्रबद्ध आणि सुयोग्य प्रयत्न करुन महापालिकेच्या उत्पन्नात मोलाची भर घालणा-या करनिर्धारण व संकलन खात्याच्या उपक्रमांची नोंद घेऊन या खात्यातील उप करनिर्धारक व संकलक (प्रभारी) प्रल्हाद कलकोटी आणि उप करनिर्धारक व संकलक (प्रभारी) अरविंद चव्हाण या दोन कार्यतत्पर अधिका-यांची ’एप्रिल 2018’ या ’महिन्याचे मानकरी’ अर्थात  म्हणून निवड करण्यात येऊन सन्मान करण्यात आला आहे.