Breaking News

मनाई’चा कत्तलखाना अवैध ; अतिक्रमण काढणार नगरपरिषद प्रशासनाचा इशारा


शहरातील मनाई परिसरात असलेला कत्तलखाना विविध मान्यता आणि प्रदूषण महामंडळाच्या ना हरकत दाखल्याअभावी अर्धवट आहे. या परिसरातील अतिक्रमणे काढून टाकण्याचे आदेश नगरपरिषदेने संबंधित ठेकेदाराला दिले आहेत. मात्र अद्यापही परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात हे अतिक्रमण काढण्यात येणार आहे, अशी माहिती नगर परषदेच्यावतीने देण्यात आली. 

या अतिक्रमणग्रस्त कत्तलखान्यास मुख्याधिकारी शिल्पा दरेकर, भाजपा गटनेते रविंद्र पाठक, शिवसेनेचे योगेश बागूल, आरोग्य सभापती अनिल आव्हाड, मनसेचे सतिष काकडे, नगर अभियंते विजय पाटील, आरोग्य विभागाचे सुनील आरण आदींनी शनिवारी {दि. १०} भेट दिली. संबंधित ठेकेदाराला यासंदर्भात सूचना देण्यात आल्या. या परिसरात असलेले पत्र्याचे शेड आणि अन्य अतिक्रमण काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अवैध कत्तलीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांची या परिसरात दैनंदिन पाहणी सुरु आहे. या कत्तलखान्याच्या मक्तेदारावर {ठेकेदार} कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात हा विषय नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चेसाठी घेण्याची सूचना यावेळी करण्यात आली.