Breaking News

रांजणगाव देशमुख ग्रामपंचायत कार्यालयाला आग


तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील ग्रामपंचायत कार्यालयाला दि. १५ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये ग्रामपंचायतमधील फर्निचरचे नुकसान झाले. काही कागदपत्रेही जळून खाक झाली. 

गुरुवारी {दि. १५} दिवसभर ग्रामपंचायत कार्यालयाचा कारभार सुरु होता. सायंकाळी कार्यालय बंद करण्यात आले. रात्री साडे अकराच्या सुमारास टँकरने पाणी आणत असलेल्या गावातील काही ग्रामस्थांना ग्रामपंचायत समोरून जाताना काहीतरी जळत असल्याचे जाणवले. त्यावेळी ग्रामपंचायत कार्यालयातून धूर निघत असल्याचे दिसले. ग्रामपंचात कर्मचाऱ्यांना खबर दिली गेली. ग्रामपंचायत कार्यालय उघडले असता आग लागल्याचे दिसले. सदर आग विझविण्याचा स्थानिकांनी प्रयत्न केला. या आगीत कार्यालयातील इन्व्हर्टर, फॅन, बॅटरी, खुर्च्या आदी सामान जळाले आहे. ग्रामपंचायतीच्या वरच्या मजल्यावर तलाठी कार्यालय आहे. सुदैवाने त्या कार्यालयापर्यंत आग पोहोचली नाही. ग्रामपंचायत कर्मचारी व नागरिकांनी रात्री आग विझवण्यासाठी सतर्कता दाखवल्याने मोठा अनर्थ टळला. 

दरम्यान, आज {दि. १७} सकाळी सरपंच व इतर ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. ग्रामविकास अधिकारी आर. एन. बांगर व सरपंच यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला जाऊन सदर घटनेची माहिती दिली. शिर्डी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेंडगे व अर्जुन दारकुंडे यांनी सदर घटनेचा पंचनामा केला. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनात आले आहे. दरम्यान, ग्रामपंचायत कार्यालय आगीच्या भक्षस्थानी पडले असून काही कागदपत्र जळाले आहेत. मात्र महत्वाची कागदपत्र सुरक्षित आहेत, अशी माहिती सरपंच संदीप रणधीर व ग्रामविकास अधिकारी आर. एन. बांगर यांनी दिली.