Breaking News

भामरागड तालुक्यातील मौल्यवान वनसंपदा वणव्याच्या विळख्यात


भामरागड तालुका मौल्यवान वनसंपदेने नटलेला आहे. मात्र वनविभागाच्या नियोजनशुन्य धोरणाचा फटका बसत असल्याने मौल्यवान वनसंपदा वणव्याच्या विळख्यात सापडली आहे. मागील तीन - चार दिवसांपासून जंगलास वणवा लागला असून लाखो रूपयांची वनसंपदा जळून खाक झाली आहे.
 
भामरागड तालुक्यातील जंगल गट्टा, ताडगाव व भामरागड वनपरीक्षेत्रात विभागून वनपरीक्षेत्राच्या सिमा आखल्या आहेत. या वनपरीक्षेत्रांतर्गत नेमणूकीस असलेले कर्मचारी किती काळ कर्तव्य बजावतात याचा काही ठावठिकाणा नाही. यावर्षी जानेवारी महिन्यापासूनच जंगलातील गवत सुकायला सुरूवात झाली. मार्च महिन्यात गवतासह लहान मोठी झाडे करपली आहेत. यामुळे थोडीशीही ठिणगी पडली तरी भडका उडून जंगल कवेत घेत आहे. दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील जंगलात आग लागली. या आगीत झाडे व मौल्यवान संपदा जळून खाक झाली. जंगलाचा काही भाग अ तिक्रमणाने वेढलेला आहे. यामुळे काही जणांनी झाडे तोडून टाकली. काही ठिकाणी उपद्व्यापी आग लावून देत आहेत. यामुळे तालुक्यातील संपूर्ण जंगल नष्ट होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. 

दरवर्षीपेेक्षा यावर्षी जंगलात आग लागण्याचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. ही बाब वनविभागास सुध्दा माहिती आहे. यामुळे वनविभागाने वनव्यावर प्रतिबंध घालण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसेच निर्देशसुध्दा वनविभागास आहेत. मात्र बहुतांश अधिकारी, कर्मचारी आलापल्ली येथून ये - जा करतात. यामुळे नैसर्गिक आपत्ती आल्यास ते वेळेवर कर्तव्यावर येवू शकत नाहीत. केवळ आदेश असल्यामुळे रस्त्यालगतचा परिसर स्वच्छ करून ठेवण्यात आला आहे. ठरवून दिलेल्या उपाययोजना संपल्या असे समजून अनेक कर्मचारी धगधगत्या वनव्याकडे दूर्लक्ष करीत आहेत. वनपरीक्षेत्र अधिकारी तसेच सबंधित अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहतात काय? याचे उत्तर कोणाकडेही नाही. या प्रकारामुळे मात्र आगीच्या विळख्यात सापडलेली वनसंपदा नष्ट होण्याचाच धोका अधिक आहे.