Breaking News

देशात रोजगार निर्मितीचा अभाव : राहुल गांधी

म्हैसूर : भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ होत आहे, मात्र त्यातून नागरिकांसाठी रोजगाराची निर्मिती होत नसल्याची खंत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे. ते क र्नाटकमधील महारानी कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही खंत व्यक्त केली. गांधी म्हणाले, की आपल्या अर्थव्यवस्थेची वाढ होत असली तरी कौशल्यपूर्ण तरुणांना अर्थपुरवठा आणि इतर मदत मिळत नाही. त्यामुळेच त्यातून रोजगारनिर्मिती होत नाही. आपल्या आधीच्या भाषणांमध्येही राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर 2 कोटी रोजगार देण्याचे आश्‍वासन पूर्ण न केल्याबद्दल टीका केली होती. फेब्रुवारीपासून राहुल गांधींचा हा चौथा कर्नाटक दौरा आहे. यावेळी बोलताना गांधी यांनी देशातील ठराविक व्यक्तींच्याच खिशात पैसे जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, की हिरे व्यापारी नीरव मोदी कोट्यवधी रुपये घेऊन फरार झाला. मात्र हा पैसा उद्योग व्यवसायासाठी तुमच्या सारख्या तरुणांना मिळाला नाही. नीरव मोदीवर पंजाब नॅशनल बँकची (पीएनबी) 13 हजार 540 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज दिवसभरात म्हैसूर, मंड्या आणि चामराजनगर जिल्ह्यांमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत देखील संवाद साधतील.