Breaking News

बियाणांमध्ये एचटीजीनचा वापर करणा-यांवर चौकशीअंती कारवाई - सदाभाऊ खोत


बी.टी. कापसाच्या बियाणांमध्ये तण नाशकाला सहनशील असणारे जनुका (हार्बीसाईट टॉलरंट ट्रान्सजेनिक जीन) चा वापर करून बियाणे उत्पादक कंपन्या बियाण्यांची व्रिक्री करत असल्याचे निदर्शनात आले आहे. याबाबत अवैध विक्रीप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग आणि राज्य शासनाच्या विशेष पथकाद्वारे चौकशी करण्यात येत आहे. चौकशीअंती अहवालानुसार कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज दिली.

यासंदर्भात विराधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत प्रश्‍न उपस्थित केला होता. खोत म्हणाले, बी.टी. कापसाच्या बियाणांमध्ये तणनाशकाला सहनशील असणा-या बियाणांची चाचणी महिको या बियाणे कंपनीकडून 2008 ते 2010 या कालावधीत केंद्र शासनाच्या जेनेटीक इंजिनियरींग अप्रायझल कमिटीच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली होती. या कमिटीच्या सूचनांच्या अनुषंगाने केलेल्या कारवाईत 58.40 क्विंटल बियाणांचा साठा आढळून आला आहे. या संदर्भात सीबीआय आणि एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे. चौकशीअंती संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती खोत यांनी दिली.