Breaking News

पर्यटनास चालना देण्यासाठी राज्याचे स्वतंत्र पर्यटन धोरण - पर्यटन मंत्री जयकुमार रावल


राज्यातील पर्यटन व्यवसायवृद्धीसाठी राज्याचे स्वतंत्र पर्यटन धोरण तयार करण्याचे काम सुरू आहे. आंतरराष्ट्रीय, भारतीय आणि राज्यातील पर्यटक अशी पर्यटकांची वर्गवारी राज्याने केली असून सर्वसामान्य माणसानेही पर्यटन करावे, यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत दिली.

पर्यटन विषयाच्या अनुषंगाने 293 च्या प्रस्तावावरील चर्चेस उत्तर देताना श्री. रावल बोलत होते. ते पुढे म्हणाले की, काही वर्षांत पर्यटन हे राज्यात सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र ठरत आहे. युनेस्कोने घोषित केलेल्या ३७ जागतिक वारसा स्थळांपैकी पाच स्थळे आपल्या महाराष्ट्रात आहेत, ही आपल्या राज्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाची बाब आहे. याशिवाय राज्यातील गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्रपणे वारसास्थळे धोरण तयार करण्यात येत असून खासदार छत्रपती संभाजी महाराज यांचा या धोरण बनवणाऱ्या समितीत समावेश करण्यात आल्याचे ते म्हणाले. तसेच पर्यटनाशी संबंधित पायाभूत सुविधांच्या विकासासाठी खाजगी कंपन्यांना मुद्रांक शुल्क, जीएसटी आणि वीज दरात सूट दिली जाणार असून त्यांना सवलतीच्या दरात जमिन आणि मुंबईसारख्या शहरात एफएसआय देण्याचा प्रस्ताव धोरणात समाविष्ट करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

औरंगाबाद येथील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी स्वतंत्रपणे औरंगाबाद पर्यटन आराखडा तयार करण्यात येत असून त्यासाठी ४४० कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती पर्यटन मंत्र्यांनी दिली. सिंदखेड राजा या जिजाऊंच्या जन्मस्थानासाठी २५ कोटींची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. जुन्नर हा पहिला पर्यटन तालुका घोषित करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

मुंबईच्या विकास आराखड्यात हिंदी चित्रपटसृष्टीचा इतिहास सांगणारे एक संग्रहालय असावे,यासाठी प्रयत्नशील असल्याची माहितीही श्री. रावल यांनी यावेळी दिली.