Breaking News

कोल्हापूर जिल्ह्यात हत्तींमुळे होणाऱ्या नुकसानीच्या अभ्यासासाठी स्थानिक आमदारांची समिती- सुधीर मुनगंटीवार



कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, भुदरगड, राधानगरी, गगनबावडा, चंदगड व शाहूवाडी या तालुक्यात हत्तींमुळे होणारे शेतीचे व जिविताचे रक्षण करण्याकरिता वन विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना कर्नाटक येथे पाठवून हत्ती पकडण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल. हत्ती व गवा रेड्यांमुळे होणारे नुकसान टाळण्याकरिता व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता स्थानिक लोकप्रतिनिधी व वन अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात येणार असून समितीने दिलेल्या अहवालावर कार्यवाही करण्यात येईल, असे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत सांगितले.


सदस्य श्रीमती संध्यादेवी देसाई-कुपेकर यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना वन मंत्री म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील या तालुक्यांमध्ये जंगली गवे, रेड्यांकडून व जंगली हत्तींमुळे पिकाच्या नुकसानाचे ३९३ प्रकरणे निदर्शनास आले आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कर्नाटक राज्यातून व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हत्ती आजरा, भुदरगड, चंदगड तालुक्यात येत आहेत. हत्तींना पकडण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने कर्नाटक शासनाकडे अशा प्रकारचे पथक महाराष्ट्रात हत्ती पकडण्यासाठी पाठविण्याबाबत मागणी करण्यात आली आहे. मात्र कर्नाटकातही हत्तींच्या प्रादुर्भावामुळे मे-जूनपर्यंत पथक महाराष्ट्रात पाठविणे शक्य नसल्याचे कर्नाटक राज्याकडून कळविण्यात आले आहे. तोपर्यंत राज्यातील काही वन कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कर्नाटकमध्ये पाठवून त्यांना हत्ती पकडण्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येईल.