Breaking News

प्रशिक्षणार्थी डॉक्टर युवतींची छेड काढल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल

सातारा, दि. 14, मार्च - सदरबझार येथील मुथा चौक ते सिव्हिल हॉस्पिटल रस्त्यावर तीन प्रशिक्षणार्थी डॉक्टर युवतींची छेड काढल्याप्रकरणी रमेश दुजा मुल्ला (सध्या रा. अमरलक्ष्मी देगाव, मुळ रा. कर्नाटक) याच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, संशयिताचा दुचाकी क्रमांक मिळाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुथा चौकात राहणारी एक प्रशिक्षणार्थी डॉक्टर युवती चालत सिव्हिल हॉस्पिटलकडे निघाली होती. याचवेळी पाठीमागून रमेश दुजा मुल्ला हा दुचाकीवरुन आला. त्याने या युवतीस उद्देशून वक्तव्ये करत अश्‍लील हावभाव केले. छेडछाडीचा प्रकार होवू लागल्याने ही युवती घाबरली व त्या युवकाला दुर्लक्षित करून ती पुढे मार्गस्थ झाली. याच दरम्यान, संशयित मुल्ला याने लगेच पाठीमागून येणा-या दुस-या एका प्रशिक्षणार्थी युवतीकडे पाहून त्याच प्रकारे अश्‍लिल हावभाव केले. त्या युवतीने बचावासाठी आरडा-ओरडा करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तो युवक पसार झाला. दुपारची वेळ असल्याने परिसरात शुकशुकाट होता यामुळे मदतीसाठी इतर कोणीही नागरिक पुढे आले नाही.
दरम्यान, काही वेळ गेल्यानंतर संशयित युवक पुन्हा त्याठिकाणी आला त्याच मार्गावरुन येणा-या तिस-या एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर युवतीची छेड काढत अश्‍लील हावभाव केले. या युवतीने थेट पोलिस ठाणे गाठले व घडलेल्या घटनेबाबत पोलिसांना सांगितले. दरम्यान, इतर दोन युवतींनी घडलेल्या घटनेबाबतही घरी सांगितल्यानंतर कुटुंबियांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, या परिसरातील स्थानिक लोकांकडे माहिती घेतल्यानंतर छेडछाड करणारा परप्रांतीय रमेश दुजा मुल्ला हा असल्याचे समोर आले. त्यानुसार या तीनही प्रकरणात त्याच्यावर छेडछाडप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले.