Breaking News

संत तुकाराम वनग्राम स्पर्धेत खांडगेदरा गावाला पुरस्कार


संगमनेर तालुक्यातील खांडगेदरा हे गाव राज्य शासनाच्या वनविभागामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय संत तुकाराम वनग्राम स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम तर राज्यात दुसरे आले. वनसंरक्षण आणि वनविकासात स्थानिक ग्रामस्थांच्या सहभागातून वनव्यवस्थापन राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार वनक्षेत्र व सीमेवर असलेल्या गावांमध्ये संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. वनांचे रक्षण करणे, अवैध वृक्षतोड, वनक्षेत्रातील अतिक्रमण, वनवणवा, अवैध चराई यांना समित्यांच्या माध्यमातून प्रतिबंध करणे अपेक्षित आहे. तसेच त्यांच्या कार्यक्षेत्रातील वनांचे व्यवस्थापन, व जनजागृती करण्याचे काम या समितीच्या सदस्यांनी करणे अभिप्रेत असते.

या कामात सतत सुधारणा होण्याच्या दृष्टीकोनातून व अधिकाधिक चांगले काम होण्यासाठी शासनाने या समित्यांमध्ये जिल्हा व राज्यस्तरिय स्पर्धा घेवून संत तुकाराम वनग्राम योजनेअंतर्गत पारितोषिके देण्याचा निर्णय घेतला. राज्याच्या वनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या निवड समितीच्या अहवालानुसार सन २०१६-१७ करिता संगमनेर तालुक्यातील खांडगेदरा गावाच्या समितीने ९९ टक्के गुण मिळवून राज्य पातळीवर दुसरा क्रमांक मिळवला. तीन वर्षांपूर्वी जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांकावर असलेल्या या गावाने सातत्याने घेतलेल्या परिश्रमामुळे त्यांना दोन्ही स्पर्धेत यश मिळवता आले.

येत्या दि. २१ मार्चच्या जागतिक वनदिनानिमित्त मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमात हे पारितोषिक देण्यात येणार आहे. संगमनेरचे उपविभागिय वनाधिकारी एम. आर. गायकर व वनपरिक्षेत्राधिकारी नीलेश आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली खांडगेदरा संयुक्त वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष रविंद्र खांडगे, वनपरिमंडळ अधिकारी घारगाव तथा सचिव बापूसाहेब काळे, वनरक्षक राजश्री दिघे, वनकर्मचारी सुखदेव गाडेकर व ग्रामस्थांनी यासाठी परिश्रम घेतले.