Breaking News

अंगणवाडीसाठी १ कोटी निधी : होन


कोपरगाव ता. प्रतिनिधी - मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात घडलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या पाचवीच्या वर्गाचे छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला होता. तर काही विद्यार्थ्यांना अपंगत्व आले होते. या शाळेच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अशा घटनांची पुनरावृत्ती कोपरगाव तालुक्यात कुठेही होऊ नये, यासाठी युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाड्या व शासकीय इमारतींच्या दुरुस्तीसाठी १ कोटी २ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला, अशी माहिती सभापती अनुसया होन यांनी दिली.

त्या म्हणाल्या, जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील सर्व अंगणवाड्या व शासकीय इमारतींची पाहणी करून एकत्रित अहवाल तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याप्रमाणे तातडीने अंमलबजावणी करून कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रत्येक गावात असणा-या शासकीय इमारती दुरुस्त करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली. यामध्ये जिल्हा परिषद शाळा, इमारतीच्या खोल्या, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, सरकारी कर्मचा-यांची निवासस्थाने, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व इमारती आदी शासकीय इमारतींची पाहणी करून या सर्व इमारतींचा एकत्रित अहवाल युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदे कडे सादर करण्यात आला होता.