Breaking News

नेवासा व्यापारी संकुलासाठी 4 कोटी मंजूर

नेवासा ( शहर प्रतिनिधी )- अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या व्यापारी संकुलसाठी 4 कोटी रुपये मंजूर झाले असल्याने व्यापारपेठेचा मोठा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. सर्वांगीण विकासासाठी व निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनांच्या पूर्तीसाठी 1 वर्षाच्या आत नगर पंचायतीला सुमारे 19 कोटी रुपयांचा निधी मिळवला. असल्याची माहिती आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. नेवासा शहर हे पहिल्यापासून सुधारणांसाठी लक्ष घातले असल्याचे सांगत आमदार मुरकुटे यांनी सांगितले की नगरपंचायतीच्या स्थापनेच्या आधीच प्रशासकीय काळात आपण साडे आठ कोटी रुपयांचा निधी आणला होता. आता नगर पंचायत ताब्यात आल्यानंतर मार्च अखेरीस नगर विकासाचे अनेक प्रस्ताव दाखल करून निधी मिळवला आहे. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगर विकास मंत्री रणजित पाटील व पालकमंत्री राम शिंदे यांचे आभार मानले. तसेच नेवासा नगर पंचायतीतील प्रशासन व पदाधिकार्‍यांनी वेगाने प्रस्ताव तयार करून स्वतः मुंबईत मंत्रालयात दिल्यामुळे कामाला चालना मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्यात विशेष करून नेवाशाच्या बाजारपेठेचा अनेक वर्षे प्रलंबित असलेला व्यापारी संकुलसाठी 2 टप्यात 4 कोटी रुपये मंजूर झाल्यामुळे नेवासा बाजार पेठेचे रूप बदलणार असल्याने मोठा आनंद झाल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. सध्या भूमिगत गटारी, स्मशानभूमी, सुलभ शौचालय, रस्ता ही कामे चालू आहेत व लवकरच नगर पंचायतीला प्राप्त निधीतून घेण्यात आलेल्या कामांच्या निविदा प्रसिद्ध करून तीही कामे काही दिवसातच सुरु होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.