Breaking News

शिवसृष्टीसाठी 25 कोटींची तरतूद


कोथरूड येथील बीडीपीच्या जागेत साकारण्यात येणा-या शिवसृष्टीसाठी महापालिका आयुक्तांच्या अंदाजपत्रकात कोणत्याही प्रकारच्या निधीची तरतूद करण्यात आली नव्हती. मात्र, स्थायी समितीने सादर केलेल्या अंदाजपत्रकात शिवसृष्टीसाठी 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.गेल्या दहा वर्षापासून येथील कचरा डेपोच्या जागेवर शिवसृष्टी साक ारण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी पालिकेने मंजूर केलेल्या विकास आराखड्यात (डीपी) आरक्षण टाकण्यात आले होते. याच जागेवर शहरातील वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावणार्‍या मेट्रो प्रकल्पाचा डेपो प्रस्तावित करण्यात आला आहे. या जागेवर भूमीगत मेट्रो डेपो आणि वरील भागात शिवसृष्टी साकारण्याचे आश्‍वासन सत्ताधा-यांनी दिले होते. मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीमध्ये कचरा डेपोची जागा मेट्रो स्टेशनला आणि चांदणी चौकाजवळील बीडीपीच्या 50 एकर जागेमध्ये शिवसृष्टी साकारण्यास मंजुरी देण्यात आली. ज्या दिवशी बीडीपीच्या जागेत शिवसृष्टी साकारण्यास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली, त्याचदिवशी ज्येष्ठ इतिहास अभ्यासक बाबासाहेब पुरंदरे यांच्याही शिवसृष्टीला शासनाने मंजुरी देऊन आर्थिक तरतूदही केली. एकाच दिवशी दोन शिवसृष्टींना मंजुरी दिल्याने भाजपच्या धोरणावर सर्वच स्तरातून टीका झाली होती. त्यातच आयुक्तांनी मांडलेल्या अंदाजपत्रकात कोथरूड येथील शिवसृष्टीस एक रुपयाचीही तरतूद केली नाही. त्यामुळे कोथरूड येथील शिवसृष्टीसंदर्भात प्रश्‍न चिन्ह निर्माण झाले होते. स्थायी समितीच्या अंदाजपत्रकात समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी कोथरुड येथील शिवसृष्टीस 25 कोटी रुपयांची तरतूद केल्याने शिवसृष्टी साकारण्याचा मार्ग काहीसा सुकर झाला आहे.