Breaking News

ज्येष्ठ पत्रकारांना 1 एप्रिल पासून सन्मान योजना लागू

सातारा, दि. 16 मार्च - राज्यातील ज्येष्ठ शासकीय क पत्रकारांना (60 वर्षे पूर्ण), आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजना लागू करण्याचा प्रस्ताव माहिती व जनसंपर्क विभागाकडून शासनास 9/11/2017 रोजी पाठवण्यात आला आहे. त्या अनुषंगाने ज्येष्ठ पत्रकारांना लवकरात लवकर ही सन्मान योजना लागू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री महोदयांचे खाजगी सचिव तसेच संचालक, माहिती, वृत्त व जनसंपर्क शिवाजी मानकर यांनी याबाबत महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीला 23 फेब्रुवारी 2018 च्या पत्रान्वये कळवले आहे. शासनाच्या या पत्रातील विनंतीनुसार महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघ (फलटण), महाराष्ट्र संपादक परिषद (मुंबई), बृहन्महाराष्ट्र जिल्हा संपादक संघ (नांदेड), महाराष्ट्र वृत्तपत्रे व पत्रकार संघटना महासंघ (संगमनेर) या संघटनांनी यापूर्वी जाहीर केलेले 28 फेब्रुवारीचे विधानभवना समोरील धरणे आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली.


याबाबत सविस्तर माहिती देताना रविंद्र बेडकिहाळ यांनी सांगितले की, राज्यात सर्वात प्रथम महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने 1987 साली ज्येष्ठ पत्रकारांना निवृत्ती वेतन मिळावे अशी मागणी के ली होती. त्याबाबत अन्य राज्यातील शासनाने लागू केलेल्या पत्रकार कल्याणाच्या योजनांची माहिती घेऊन वेळोवेळी या प्रश्‍नांचा गेली 31 वर्षे आम्ही समविचारी पत्रकार संघटनांच्या सहकार्याने राज्य शासनात पाठपुरावा केला होता. तसेच 3 वर्षापूर्वीच या योजनेला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव द्यावे अशी मागणीही केली होती. ज्या ज्येष्ठ शासकीय अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनी वयाची 60 वर्षे पूर्ण केली आहेत व पत्रकारितेशिवाय ज्यांचे व्यावसायिक उत्पन्न नाही, जे आयकर भरत नाहीत अशा गरजू ज्येष्ठ पत्रकारांना दरमहा रुपये 10,000/- सन्मान मानधन द्यावे ही मागणी आता मान्य झाल्याने अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी याबाबत महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीला धन्यवाद दिले आहेत. 
महाराष्ट्र राज्य प्रसारमाध्यम व वृत्तपत्रे अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी यांनीही या प्रश्‍नात तातडीने लक्ष घालून राज्य अधिस्वीकृती समितीच्या बैठकीत राज्यशासनाला ही योजना तातडीने कार्यवाहीत आणण्याचा खास ठराव करुन मा.मुख्यमंत्र्यांकडे त्याचा पाठपुरावा केला आहे. याबद्दल त्यांनाही अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी धन्यवाद दिले आहेत.