Breaking News

१५ व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप


मुंबई ही भारताची चित्रपट निर्मितीची राजधानी आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामुळे लघुचित्रपट निर्मात्यांना एक व्यासपीठ उपलब्ध झाले असल्याचे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी केले.
१५ व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप समारंभ आज येथील एनसीपीए येथे पार पडला. त्याप्रसंगी राज्यपाल बोलत होते. कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे,चित्रपट महोत्सवाचे आयोजक तसेच फिल्म डिव्हिजनचे संचालक मनीष देसाई, चित्रपट निर्माते किरण शांताराम, चित्रपट-लघुपट निर्माते श्याम बेनेगल आदी उपस्थित होते. यावेळी श्याम बेनेगल यांना या वर्षीचा 'व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार' राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

राज्यपाल म्हणाले, पुरस्कार विजेते श्याम बेनेगल हे केवळ चित्रपट निर्मातेच नव्हे तर सामाजिक भान असलेले उत्कृष्ट लघु चित्रपट निर्माते आहेत. भारतामध्ये दरवर्षी १६०० फिचर फिल्म्सची निर्मिती होते. यामध्ये हिंदी, तमिळ, तेलगू, बंगाली, मराठी अशा सर्व प्रादेशिक भाषांचा समावेश आहे. भारतीय चित्रपट जगभरात पाहिले जातात. लघुचित्रपटातून सामाजिक प्रतिमेचे दर्शन होत असते.