Breaking News

गंभीर गुन्ह्यांतील पाच जणांविरुद्ध मोक्का


लोणी । प्रतिनिधी। लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी, रस्ता लूट, पोलिसांवर हल्ला करणे, शस्त्र बाळगणे अशा गंभीर गुन्ह्यांसाठी पोलिस ज्यांच्या तपासावर होते, त्या पाच जणांना मोक्का लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. श्रीरामपूर येथील तौफिक सत्तार शेख, राहुल विलास शेंडगे, गौरव रविंद्र बागूल, ममुनशन तथा साजिद खालिद मलिक यांचा यामध्ये समावेश आहे. नाशिकचे पोलिस महानिदेशक यांनी या सर्वांविरुद्ध मोक्का लावण्यास मंजुरी दिली आहे, अशी माहिती लोणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी दिली. या आरोपींनी दि. २८ ऑगस्ट २०१७ रोजी रात्रीच्यावेळी बाभळेश्वर श्रीरामपूर-रस्त्यावर जबरी चोरी केली होती. त्यांनी साखळी पद्धतीने गुन्हे केले होते. पोलिसांच्या अंगावर दुचाकी घालून हल्ला केला होता. तसेच गावठी कट्ट्यातून फायरदेखील केले होते. पोलिस व साक्षीदार यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या आरोपींना पोलिसांनी पिंपरी निर्मळ शिवारातून ताब्यात घेतले होते. लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन तर श्रीरामपूर ठाण्याच्या हद्दीत दोन असे एकाच दिवशी पाच गुन्हे त्यांनी केले होते. कोपरगाव, राहता हद्दीतही त्यांनी खून, खुनाचा प्रयत्न दंगा, दरोडा, दुचाकी चोरी, शस्त्राचा धाक दाखवणे, रस्ता लूट करणे असे अनेक गुन्हे विविध पोलीस ठाण्यात ठाण्यात त्यांच्याविरोधात दाखल आहेत. या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. गुन्ह्याचा प्रतिबंध व्हावा व जनतेच्या मालमत्तेचे रक्षण व्हावे, या हेतूने जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या आदेशाने शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक डॉ. सागर पाटील यांनी वरील आरोपींविरुद्ध नाशिकचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्याकडे मोक्का अंतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव पाठवला होता. त्यास मंजुरी मिळाली असून संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक अशोक थोरात यांच्याकडे पुढील तपास देण्यात आल्याचे गलांडे यांनी सांगितले.