तुमसर शहराच्या पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी १२५ कोटींचा निधी देणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
तुमसर नगरपरिषदेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. परिणय फुके, चरण वाघमारे,जिल्हाधिकारी सुहास दिवसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी,तुमसर नगराध्यक्ष इंजि. प्रदीप पडोळे यांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, तुमसर नगरपालिकेला आज दीडशे वर्ष पूर्ण झाली. पण आजही मूलभूत सुविधा पूर्ण करु शकलो नाही. राज्याचे नियोजन करीत असताना शहराकडे मोठे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले. शहराच्या विकासासाठी निधी देण्यात आला नाही. लोक गावांकडून शहरांकडे आले पण त्यांचा निवारा, पाणी, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी, आरोग्य , दिवाबत्ती,शिक्षण यासाठी ज्या व्यवस्था उभ्या करायला पाहिजे होत्या. त्या दुर्दैवाने आपण उभ्या करु शकलो नाही ही खंत व्यक्त करुन ते म्हणाले, देशात मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यानंतर जसे गावांकडे लक्ष देण्यात आले तसे शहरांकडे लक्ष देण्यात येत आहे. गरीब माणसाला रोजगार मिळाला पाहिजे. अन्न, वस्त्र, निवारा उपलब्ध करुन देत असताना अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन शहरे चांगली झाली पाहिजे, असे ते म्हणाले