Breaking News

छिंदम याचे अवमानकारक वक्तव्य कुप्रवृत्तीचे प्रदर्शन करणारे; खा. उदयनराजे भोसले यांच्याकडून ’त्या’ वक्तव्याचा समाचार

सातारा : कोणत्याही व्यक्तीने काही बोलण्यापूर्वी आपली वैचारिक उंची आणि पात्रता काय आहे आणि आपण कुणाबद्दल बोलतो याचा विचार आधी केला पाहीजे. श्रीपाद छिंदम याने, उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करुन, आपली कुप्रवृत्तीचे प्रदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराजच नव्हे तर कोणत्याही महापुरुषावर कोणी उपटसुंभ टिका करतो, त्यावेळी मनस्वी संताप येतो. अशा दुष्ट प्रवृत्तीचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतोच तथापि त्यांनी यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे महापुरुष समजुन घ्यावेत अशा भावनीक तथापि उद्वेगजनक शब्दात श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी अहमदनगर महापालिकेचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला.


छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा पुरुष जन्माला यायला संपूण युगाचा कालावधी लागत असावा इतके कर्तुत्वान युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचे आहे. जाती-पातीचा भेदभाव न ठेवता, सर्व जाती धर्माला समान न्याय देत, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य उभारणी केली. त्याकरीता त्यांनी असिम त्याग केला. राज्यकर्ता कसा असावा, जनतेप्रती त्याचे उत्तरदायित्व काय असावे, वंचितांना मुख्य प्रवाहात कसे आणावे, शेतकरी जगाचा पोशिंदा असल्याने, त्याच्या बाबतीत कोणती राजनिती असावी, न्यायदान कसे असावे, शेतजमिनींवर आकारण्यात येणारा शेतसारा कसा आकारावा, त्याचे मापदंड काय असावेत, महिलाभगीनींविषयी राज्यकर्त्यांचे काय धोरण असावे, युध्दनीती कशी असावी, गनिमी कावा केव्हा राबवावा, इत्यादी अनेक रोजच्या जीवनातील प्रश्‍नांवर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांनी ठरवून दिलेली शिवनीती संपूर्ण जगात सर्वेश्रेष्ठ ठरली आहे. छत्रपती शिवरायांच्या बाबतीत काही बोलण्यापूर्वी छत्रपती शिवराय आधी समजुन घ्यावे लागते. श्रीपाद छिंदम सारख्या उचलली जीभ लावली टाळाल्या अशा नीतीमत्तेच्या व्यक्तींना शिवाजी महाराज समजुन घेण्यासाठी म्हणूनच कदाचित अनेक जन्म घ्यावे लागतील.
ज्यांची क्षमता आणि पात्रता नाही अशा व्यक्ती काही बोलतात, त्यांच्या त्याप्रवृत्तीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतोच तथापि त्यांना छत्रपती शिवाजी महाराज समजुन घेण्याची सुबुध्दी मिळो, अशा शब्दात श्रीपाद छिंदम यांना फटकारताना, शिवजयंतीच्या पार्श्‍वभुमीवर सर्व शिवप्रेमी आणि शिवभक्तांनी संयम राखुन मोठ्या दिमाखात शिवजयंती महोत्सव साजरा करावा, शिवजयंती उत्सवात कोणत्याही प्रकारचे गालबोट न लागता, शिवप्रेमींनी कार्यरत रहावे, असे आवाहन श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले आहे.